भंडारा : घराच्या अंगणात तब्ब्ल आठ ते दहा लहान-मोठे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. वनविभागाने गावात धाव घेतली. रात्री-अपरात्री गावाबाहेर फिरू नये, असा इशारा दिला. महिनाभरापूर्वी याच परिसरात बिबट आणि बछडा आढळून आला होता. पवनी तालुक्यातील चकारा येथील प्रमोद कोचे यांच्या घराच्या अंगणात शुक्रवारी सकाळी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसले. आठ ते दहा ठसे लहान-मोठ्या आकाराचे आहेत. ही माहिती अड्याळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून पाऊलखुणांची पाहणी केली. तेव्हा सर्व ठसे बिबट्याचे असल्याचे निष्पन्न झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्रसहायक विनोद पंचभाई, रमेश कानसकर, सोनू निंबार्ते यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी रात्री-अपरात्री घराबाहेर फिरू नये, घरासमोर प्रकाश करावा, अशा सूचना देण्यात आल्या.
महिनाभरापूर्वी चकारा येथील पाटबंधारे विभागाच्या पडक्या इमारतीत बिबट्याचा बछडा आढळून आला होता. त्यानंतर सायंकाळी एक मादी बिबट त्या पिलाला तोंडात पकडून जंगलाच्या दिशेने नेत असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले होते. आता महिनाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा चकारात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
बॉक्स
पथदिवे सुरू आहेत म्हणून...
पवनी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा २० दिवसांपासून खंडित आहे. त्यावर कोणताच तोडगा निघाला नाही. परंतु चकारा येथील पथदिवे सुरू आहेत. आधीच वन्यप्राण्यांची, त्यातही बिबट्याची दहशत आणि गावात अंधार यामुळे नागरिक घाबरलेले आहेत. चकारा येथील पथदिवे सुरू असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. पथदिव्यावर तोडगा काढावा, अशी यानिमित्ताने मागणी आता पुढे येत आहे.