अड्याळ : घराशेजारी गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून बिबट्याने तब्बल १२ शेळ्यांना ठार केल्याची घटना बुधवारी रात्री पवनी तालुक्यातील चिखली येथे घडली. यात शेतकऱ्याचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले.
चिखली येथील देवराम नत्थू रोहणकर यांनी आपल्या घराशेजारच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे शेळ्या बांधल्या होत्या. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट्या गोठ्यात शिरला. त्याने एक - दोन नव्हे तब्बल १२ शेळ्यांवर हल्ला करून ठार केले. संपूर्ण कुटुंब झोपेत असल्याने हा प्रकार सकाळी उघडकीस आला. बिबट्या एकटा नसावा, २ बिबट असावेत असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली. अनेकांनी रोहणकर यांच्या घराकडे धाव घेतली. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक वि.बा. पंचभाई, बीट रक्षक जी.डी. हटवार, आर.एम. कानसकर, ए.एस. कनवाडे यांना होताच त्यांनी घटस्थळ गाठले.
या शेतकऱ्याला वनविभागाने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी सरपंच प्रदीप चुधरी, सुरेश काटेखाये, नरेश निरगळे, भारत कुर्झेकर, स्वाती देशमुख, अर्चना गजभिये यांनी केली आहे.