अड्याळ : पवनी तालुक्यातील नेरला परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. गत तीन दिवसात बिबट्याचे दर्शन झाल्याने सायंकाळनंतर घराबाहेर व शेतशिवारात जाणेही नागरिकांनी टाळले आहे. विशेष म्हणजे या बिबट्याने पहिल्याच दिवशी एक शेळी फस्त केली.
अड्याळ नजीकच्या नेरला येथे गत तीन दिवसात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. पहिल्याच दिवशी गणेश कुबडे यांच्या मालकीची शेळी फस्त केली. दुसऱ्या दिवशी विष्णु घोडमारे यांना बिबट्याचे दर्शन झाले. तिसऱ्या दिवशी सुभाष शेरखुरे यांनाही बिबट्याशी आमरासमोर व्हावे लागले. नशीब बलवत्तर म्हणुन जीवीतहानी झाली नाही. मात्र या घटनांनी नेरला ग्रामवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नेरला गाव परिसर जंगलव्याप्त असुन त्यामध्ये पाण्याचा साठाही आहे. गावात घरोघरी पुरक व्यवसाय म्हणुन शेळी पालन केले जाते. ग्रामस्थांची शेती पुनर्वसनात गेल्यामुळे काही प्रश्न निकाली आहेत. अशातच पाळीव प्राण्यांवर व्यवसाय करीत असतानाच बिबट्याच्या दहशतीमुळे हा व्यवसायही धोक्यात आला आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नेरला ग्रामवासीयांनी केली आहे. दरम्यान आरडाओरड करुन किती दिवस बिबट्याला पळवुन लावायचे असा सवालही नागरिक विचारीत आहेत.