लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शिकारीच्या शोधात जंगलातून भरकटलेल्या एका बिबट्याने दोन बछड्यांसह गावालगतच्या नाल्याच्या झुडुपात माकडाची शिकार करून ठिय्या देण्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. बिबट असल्याची माहिती होताच गावकऱ्यांनी एकाच गर्दी केली. या प्रकाराची माहिती वनविभाग व पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळ गाठून गर्दी हटविली. मात्र या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी सकाळी गावातील प्रभाकर ठाकरे हे गावालगतच्या नाल्यावर शौचास गेले होते. यावेळी त्यांना झुडुपात एक बिबट व दोन बछडे दिसले. त्यांनी तेथून धूम ठोकत गाव गाठले. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना दिली. ही माहिती गावात होताच गावकऱ्यांनी नाल्यावजवळ एकच गर्दी केली. वनविभाग व पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. बिबट्याच्या भीतीने अनेकांनी घरांच्या छतावरून बिबट व बछड्यांचे दर्शन घेणे सुरू केले. वनविभाग व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिबट्या व बछड्यांच्या सुरक्षिततेसह दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांची तेथून हटविले. वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक जे. के. दिघोरे, आय. जी. निर्वाण, आर. आर. दुनेदार, वनरक्षक बी. एस. पाटील, जी. डी. हत्ते, आर. ए. मेश्राम, केवट, वनमजूर विकास भुते, पांडुरंग दिघोरे, हरिश्चंद्र समरत यांच्यासह पोलीस अंमलदार नीलेश चव्हाण, टेकचंद बुरडे आदी गस्त घालत आहेत.
बाभळीच्या झाडावरून वनमजुराची गस्त- नाल्यालगतच्या झुडुपात बिबट्यासह दोन बछड्यांनी ठिय्या मांडल्याने दुर्घटना टाळण्यासाठी वन कर्मचारी व पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनमजूर विकास भुते एका बाभळीच्या झाडावर बसून आहे. गावकऱ्यांना या ठिकाणी येण्यास अटकाव केला असला तरी तेथे नागरिकांची गर्दी होत आहे.
दहा दिवसांपूर्वी मारल्या होत्या ३४ कोंबड्या- शिकारीच्या शोधात आलेल्या बिबट्याने ९ फेब्रुवारी रोजी खैरीपट येथील शुभम भागडकर यांच्या गाठ्यात प्रवेश करून ३४ कोंबड्यांसह एका श्वानाची शिकार केली होती. आता १० दिवस लोटत नाही तोच दुसऱ्यांदा बिबट्यासह दोन बछडे गावाजवळील झुडुपात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नागरिकांत दहशत पसरली आहे.