शेतकरी अभ्यास दौऱ्याने शेतकऱ्यांच्या विकासात्मक बुद्धीला वाव मिळतो. त्यांच्याकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळतो. नवे काही करण्याची प्रेरणा मिळते. अभ्यास दौऱ्यातून शेतकरी हुशार होतो. ऋतुमानानुसार हंगामाचा अभ्यास येतो. परिणामी शेतकरी चहुबाजूने अभ्यासू होत, शेतीविषयी आपुलकी वाढते. अशा विविध प्रेरणादायी कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या पुढाकारातून शेतकरी वर्गाकरिता अभ्यास दौरा आयोजित केलेला असतो. मोहाडी तालुक्यातील सालेबडी येथील जय किसान सेंद्रिय शेती गट या बचत गटांतर्गत ३० शेतकऱ्यांनी बंडू तानाजी बारापात्रे यांच्या 'पौर्णिमा फार्म' ला भेट देत सुमारे ३२ एकर शेतीतील बागायत व फळबाग प्रत्यक्ष अनुभवली. यात बंडू बारापात्रे यांनी आखलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान शेती शेतकरी वर्गांना प्रभावी ठरले. एखादा कारखाना ज्या पद्धतीने नियोजित असतो व उत्पादन ठरलेले असते. नेमके त्याच पद्धतीत संपूर्ण शेतीत विविध पिके घेत उत्पादनाची हमी तंत्रज्ञान युगात प्रेरणादायी ठरली.
कृषितज्ज्ञ सुधीर धकाते यांनी शेतकऱ्यांना जमीन तयार करण्यापासून तर उत्पन्न हाती येईपर्यंतच्या संपूर्ण अभ्यासाची माहिती थेट शेतावरच दिली. यात हिरवळीचे खत, जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक, खत ,रोग-कीड, सिंचनाचे व्यवस्थापन ,मालाची प्रतवारी ,ऋतुमानानुसार पीक पद्धत ,मार्केटिंग अशा विविध बाबींवर सखोल माहिती देत शेतकऱ्यांचे मनोबल उंचावत शेती विषयी विस्तृत अभ्यास दिवसभराच्या शेती शाळेत दिला. या शेती शाळेला अपेक्षा बोरकर बीटीएम आत्मा, कृषी सहायक टेकाडे, गुंडे ,धापटे व शेतकरी गटाचे प्रवर्तक सतीश ठवकर उपस्थित होते.
कोट
शेतकऱ्यांना नवं काही शिकता यावं, याकरिता पौर्णिमा फार्म अर्थात बागायती शेतीची बांधणी केली आहे. आज रोजी शेतावर मिरची, टमाटर ,भेंडी, वांगी, ढोबळी मिरची ,कोहळा, पपईची लागवड केलेली आहे. तंत्रशुद्ध शेती इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे. मी एक व्यापारी असून बागायतदार आहे. शेतकऱ्यांनी चांगलं ते घेत इतरांनाही चांगले देण्याचा प्रयत्न करावा. याच प्रेरणेने पौर्णिमा फार्म तंत्रशुद्ध तयार केलेला आहे. दररोज ट्रक भर भाजीपाला बीटीबी येथे विक्रीला मिळतो आहे.
बंडू बारापात्रे, प्रगतिशील शेतकरी तथा अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी भंडारा.