अडयाळ : आमदार विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वाचनालय बांधकाम आणि व्यायाम शाळा बांधकाम गेली दोन वर्षांपूर्वी मंजूर होऊन आहे. या कामाचे एकदा भूमिपूजनही झाले. गावातील अशोक नगरातील एका मोकळ्या भूखंडात ही इमारत तयार होणार होती. पण शासकीय मालकीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने ती जागा रद्द करून आता तिसऱ्या ठिकाणी त्या सार्वजनिक वाचनालय तथा व्यायाम शाळेची इमारत तयार होणार असल्याची गावात चर्चा आहे.
या इमारतीच्या बांधकामामुळे गावात बऱ्याच लहान मोठ्या घडामोडी ग्रामस्थांना पहायला मिळाल्या. पण त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचे म्हणजे अशोक नगरात जे मोकळे भूखंड आहेत ते आहेत कुणाचे?. गत २० वर्षांपासून अशोक नगराची संथपणे वाढ झाली. पण जेव्हा ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी याच इमारतीच्या बांधकाम करण्याच्या हेतूने पुढे पाऊल घातले तर असा प्रकार पुढे आला आहे. यामुळे ग्रामपंचायत अडयाळने त्या इमारतीची जागा तर बदली केली पण अद्याप इमारतीच्या कामाला कुठलीही सुरुवात झाली नाही. कदाचित याही ठिकाणी अडचणीत वाढ होणार, या भीतीपोटी अद्याप कामाला सुरुवात केली गेली नाही का? अशीही चर्चा गावात सुरू आहे.
अडयाळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या एकूण जागा किती? त्यात गेल्या दोन वर्षांपासून गावातील व्यायाम शाळा व वाचनालय इमारत बांधकामाचे भिजत घोंंगडे आहे. एकदा भूमिपूजन झाले, दोनदा जागा बदलून झाली. आता तिसऱ्या जागेवर त्या इमारतीचे बांधकाम होईल काय, असा प्रश्न आहे. अशोक नगर जेव्हा स्थापन करण्यात आले तेव्हापासून ते आजपर्यंत ग्रामपंचायतीने सिमेंट रस्ते, नाली बांधकाम मोठ्या तडकाफडकी केले. पण जो मोकळा मोकळा भूखंड आहे तो नेमका आहे कुणाचा ? याकडे कधी लक्षच घातले नाही. त्याच वेळी लक्ष दिले असते तर आज अडचणीचा सामना कदाचित कुणालाही करावा लागला नसता.