देवानंद नंदेश्वर
भंडारा ः चर्मोद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्थान मिळावे म्हणून संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला असून लेदर एक्स्पोर्ट कॉन्सिलसोबत करार करून उभारी देण्याचे प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात चर्मकार समाजातील युवकांना विकासाच्या प्रवाहात हक्काचे स्थान मिळेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील युवकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ आणि लिडकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने कृती आराखडा तयार करण्यात आला. लेदर एक्स्पोर्ट कॉन्सिलसोबत करार करून चर्मोद्योगाला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याकरिता लिडकॉम आणि महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या पुढाकारातून हे प्रयत्न सुरू असून आराखडा तयार करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना आहेत. चर्मकार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी चर्मकार आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या महामंडळाने समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. व्यस्थापकीय संचालकपदावर धम्मज्योती गजभिये रुजू झाल्यानंतर अनेक बदल केले. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता योजनांना गती प्राप्त करून दिली आहे.
चर्मकार कामगार, त्यातही चौकात उकाड्यात छत्रीखाली पादत्राणे शिवणाऱ्या गटई कामगार बांधवांचे दैनंदिन प्रश्न सुटावेत, त्यांचे जगणे सुधारावे, त्यांना स्वकष्टाने, स्वाभिमानाने जगता यावे. या समाजातील पुढच्या पिढीचे भविष्यही स्वावलंबी आणि उज्ज्वल व्हावे या हेतूपूर्तीसाठीच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. याला आता लिडकॉमची जोड मिळाली आहे. मंडळांतर्गत स्थानिक पातळीवर ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना प्रशिक्षण,गटई स्टॉल योजना राष्ट्रीयकृत बॅंकेमार्फत राबविण्यात येतात. याशिवाय होतकरू विद्यार्थ्यांना देश-परदेशातील शिक्षणासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळातर्फे आर्थिक मदतीच्या योजना राबवण्यासाठी नुकताच आराखडा तयार करण्यात आला आहे. लिडकॉमच्या माध्यमातून आगामी काळात राज्यात २५ हजार चर्मकार युवकांना चर्मोद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येईल. हा उद्योग वाढवण्यासाठी पोलिस विभागास चामड्याच्या वस्तूंचा पुरवठा करण्याबाबतचा नवीन प्रस्तावही तयार करण्यात आला. महामंडळातील कर्मचारी भरतीपासून तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. कृती आराखडा २५००० उद्योजक घडविण्याचा प्रयत्न महामंडळांतर्गत ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्यात येईल भाग भांडवल एक हजार कोटीपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न. महामंडळाची वेबसाइट नव्याने तयार करण्यात येईल. नव्याने ई-कॉमर्स पोर्टल तयार करण्यात येईल. विभागीय स्तरावर चर्मवस्तू प्रदर्शनाची योजना -नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न
चर्मकार समाजातील मुला-मुलींना शिक्षण-प्रशिक्षणातून उद्योजक तयार करण्यापर्यंतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. चर्मकार कारागिरांना प्रोत्साहित करून विविध क्लस्टरची निर्मिती करण्यात येईल. त्या माध्यमातून स्थानिक पातळीवर चर्मोद्योगाला प्रोत्साहन मिळेल.राज्यातील चर्मकार समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचा सरकारचा आणि महामंडळाचा उद्देश आहे. -धम्मज्योती गजभिये, व्यवस्थापकीय संचालक , लिडकॉम, महाराष्ट्र.