सोमेश्वर कचरू दिघोरे (४०) रा. उमरी ता. पवनी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे तर किरण विजय दिघोरे रा. उमरी असे मृत साळीचे नाव आहे. सोमेश्वर आणि त्याचा चुलत भाऊ विजय या दोघांच्या पत्नी सख्या बहिणी आहेत. सोमेश्वर हा गावातील प्लॉटवर पत्नी बालीसोबत राहत होता तर विजय आपली पत्नी किरण हिच्यासोबत उमरी गावात राहत होता. सोमेश्वर आणि पत्नी बाली यांच्या नेहमी वाद होत होते. ती गावात असलेल्या आपल्या बहिणीला हा प्रकार सांगायची. त्यामुळे सोमेश्वरच्या मनात तिच्याविषयी राग होता. या रागातूनच ३ फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपी सोमेश्वर याने किरणच्या घरी जाऊन तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केले. त्यावेळी आरडाओरडाने परिसरातील नागरिक गोळा झाले. आरोपी सोमेश्वर हातातील कोयता फेकून तेथून पसार झाला. जखमी अवस्थेत किरणला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दरम्यान दुसऱ्या दिवशी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी लीला राजकुमार डहारे यांनी पवनी ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश जाबुकश्वार यांनी घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. तपासात आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. सबळ पुरावे गोळा करून प्रकरण भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्याची सुनावणी प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू एस. शेंडे यांच्या न्यायालयात चालली. सरकार पक्षातर्फे ॲड. दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली. पुराव्याच्या आधारे सोमेश्वर दिघोरे विरूद्ध खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला आजन्म सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, पैरवी अधिकारी अंजली चिखले यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने गुन्ह्यात दोष सिद्धी झाली.