लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आईबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने पवनी येथील पानठेला चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देत ठार मारल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी ठोठावली.लोकेश आनंदराव बारसागडे (३६) रा. आंबेडकर चौक पवनी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर विकास पांडूरंग भोगे (४७) रा. साकोली वॉर्ड पवनी असे मृत पानठेला चालकाचे नाव आहे. पवनी येथे १५ आॅक्टोंबर २०१२ रोजी आरोपी लोकेशच्या आईबाबत विकासने अपशब्द वापरले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात लोकेशने आपल्या स्कुटीच्या डिक्कीत लपवून आणलेले पेट्रोल विकासच्या अंगावर ओतले व पेटवून दिले. विकास गंभीर जळालेल्या अवस्थेत विकासला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पवनी पोलीस ठाण्यात सुरूवातीला भादंवि ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आर.एस. डेरे यांच्याकडे देण्यात आला. मात्र २३ आॅक्टोंबर रोजी विकासचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी लोकेशविरूद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला पवनी येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी साक्ष पुरावा गोळा करून आरोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.सदर गुन्ह्याची सुनावनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांच्या न्यायालयात करण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. प्रमोद भुजाडे यांनी योग्य बाजू मांडत १२ साक्षदार तपासले. शनिवारी न्यायालयाने गुन्ह्याचे स्वरूप व गंभीरता लक्षात घेवून आरोपी लोकेश बारसागडे याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड ठोठावला. याप्रकरणाचा तपास तत्कालीन ठाणेदार पोलीस निरीक्षक आर.एस. डेरे यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून चंद्रशेखर पटले यांनी काम पाहिले.
पानठेला चालकाला जाळणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 9:43 PM
आईबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त झालेल्या एका तरूणाने पवनी येथील पानठेला चालकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटून देत ठार मारल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साली यांनी ठोठावली.
ठळक मुद्देपवनीची घटना : अंगावर ओतले होते पेट्रोल