भंडारा : जिल्हा प्रशासनाने १८ दिवसांपूर्वी वैनगंगा नदीवरील जुना कारधा पुलावरील रहदारी कायमस्वरूपी बंद केली. मात्र, पुलावरील लाेखंडी कठडे नसल्याने नागरिकांची येथून जीवघेणी वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दाेन्ही बाजूने अशी व्यवस्था झाली आहे.
गाेसेखुर्द प्रकल्पांतर्गत वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ करण्यात आली आहे. २४५.५० मीटर जलसाठा वाढविण्यापर्यंत निर्णय झाला आहे. त्या दिशेने कार्यही सुरू आहे. जलपातळीत वाढ हाेत असतानाच २४ नाेव्हेंबरला जिल्हा प्रशासनाने कारधा जुना पुलावरील वाहतूक कायमस्वरूपी बंद केली. त्या दिवसापासून येथून रहदारी बंद हाेती.
मात्र, दाेन ते तीन दिवसांपासून या नदीपुलावरील दाेन्ही बाजुकडील लाेखंडी कठडे नसल्याचा फायदा दुचाकीस्वार उचलत आहे. अगदी दाेन फुट अंतरावर रॅलींगच्या बाजूला कच्चा रस्ता आहे. याच रस्त्यावरून कठडा ओलांडत जुना पुलावरून वाहतूक सुरू आहे. कठडा नसल्याने केव्हा माेठी अनुचित घटना घडेल याचा नेम नाही. मात्र नागरिकही जीव मुठीत घेऊन जमिनीवरील लाेखंडी रॅलिंग पार करीत वाहतूक करीत आहेत.
इंग्रजकालीन या पुलाने शंभरी गाठली आहे. परिणामी हा पूल २०१६ मध्येच जिल्हा प्रशासनाने जड वाहतुकीसाठी बंद केला हाेता. तेथून ग्रामवासीयांच्या आग्रहास्तव फक्त दुचाकी वाहतूक सुरू हाेती. या पुलावरून ग्रामीण भागातून माेठ्या प्रमाणात मजूर वर्ग भंडारा शहरात येत असे. आजही वाहतूक बंद असली तरी सायकलने येणारे काही मजूर या पुलावरून येत आहेत. आतातर लाेखंडाची रॅलिंग नसल्याने दुचाकीस्वारांचे चांगलेच फावले आहे. जीवावर बेतून हा सर्व प्रकार सुरू आहे. याकडे जिल्हा प्रशासन काेणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जबाबदारी कुणाची ?
वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाल्याने जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा भार नवीन पुलावर आला आहे. मजूरवर्ग व दुचाकीधारक जीव मुठीत घेवून मोठ्या पुलावरही रहदारी करीत आहे. जुना पुलावरुन वाहतूक बंद झाल्याचा संतापही व्यक्त करण्यात येत असताना जुना पुलावरुन वाहतूक बंद झाल्याचा संतापही व्यक्त करण्यात येत असताना जुना पुलावरील धोक्याची वाहतूक होत आहे. यात अनुचीत घटना घडल्यास जबाबदारी कुणाची असा प्रश्न उपस्थित होतो.