सुविधांचा अभाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलनलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : मागील दोन वर्षांपासून लाखनी ग्रामीण रूग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. रूग्णालयात येणारे रूग्ण मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत, परंतु दोन वर्षांपासून रूग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नाही. त्यामुळे ग्रामीण रूग्णालयातील रूग्णसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या प्रतिमेची महाआरती करून संताप व्यक्त केला.मागील सहा महिन्यांपासून लाखनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ग्रामीण रूग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, याकरिता आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परंतु निवेदनाला केराची टोपली दाखविली आहे. आरोग्यमंत्री असलेले डॉ.दीपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु अजूनपर्यंत त्यांनी कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने आरोग्यमंत्र्यांची गांधीवादी विचारसरणीचे अनुकरण करीत बुधवारला दुपारी महाआरती करण्यात आली. या रूग्णालयातल समस्या येत्या १० दिवसात मार्गी न लागल्यास लाखनी ग्रामीण रूग्णालयात आरोग्यमंत्र्यांचा दशक्रिया, पिंडदान व मुंडन कार्यक्रम करण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला.यावेळी नगर पंचायत उपाध्यक्ष धनू व्यास, जिल्हा महासचिव बाळा शिवणकर, महिला तालुकाध्यक्ष उर्मिला आगाशे, मंदा गभणे, दिनेश निर्वाण, अजय नान्हे,निलेश गाढवे, शशिकांत भोयर, रामा गिऱ्हेपुंजे, नितीन निर्वाण, सुभाष खंडाते, शैलेश गायधनी, आकाश गहरवार, विशाल निर्वाण, गोपाल गायधनी, शुभम रहांगडाले, सोनू गिऱ्हेपुंजे, अश्विन हटवार, लालू बडगे, अन्ना गभणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
लाखनीत आरोग्य मंत्र्यांची महाआरती
By admin | Published: June 22, 2017 12:24 AM