शुभवर्तमान : राजीव गांधी जीवनदायी योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया भंडारा : घरची परिस्थीती हलाखीची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध-अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदा हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरिराला अशुद्ध रक्ताचा पुरवठा होत होता. त्यामुळ थोड चाललं- बोललं तरी धाप लागायची. ओठ, हातापायाची नखं काळी-निळी पडायची. खाजगी डॉक्टरांनी आॅपरेशनचा खर्च तीन लाख रुपये सांगितला. परंतु पैसे नसल्यामुळे आईवडीलांनी तिला नशीबावर सोडून दिले होते. अशातच राजीव गांधी जीवनदायी योजना ‘सांजवी’साठी वरदान ठरली. या योजनेतून सांजवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सांजवीला नव्या आयुष्याचे दान मिळाले. भंडारा तालुक्यातील पाच किलोमीटरवर असलेल्या फुलमोगरा या गावी मनोज आणि अंजली बडगे हे कुटुंब राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. तीन भावंडामध्ये सांजवी मोठी. अडीच वर्षाची असताना तिला खुप ताप आला. त्यावेळी तिला नागपुरातील सुपर स्पेशालिटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगितले. आॅपरेशनशिवाय हा आजार बरा होऊ शकत नाही, त्यामुळे आॅपरेशन करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु बागडे कुटूंबियांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे तिचे पैशाअभावी आॅपरेशन होऊ शकले नाही. सांजवी मोठी व्हायला लागली तसा तिचा त्रास वाढत होता. १० पावलं चालली तरी तिचा श्वास भरून यायचा. ओठ, हातापायाची नखे निळी पडायची. शाळेत नाव घातले पण मध्येच शाळेतील शिक्षक तिला घरी आणून सोडायचे. तिची अभ्यासातील प्रगतीही त्यामुळे जेमतेम होती. सतत आजारी पडायची. अशाच अवस्थेत सांजवी नऊ वर्षाची झाली. आॅगस्ट २०१३ मध्ये राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सांजवीला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सांजवीच्या आईवडिलांना तिच्या सगळया तपासणी करण्यासाठी सांगितले. इको तपासणीत तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले. डॉ. वासनिक आणि डॉ.मेश्राम यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून तिचे आॅपरेशन करून घेण्यासाठी सांजवीच्या आईवडिलांकडे पाठपुरावा केला. सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात आॅगस्ट २०१५ मध्ये सांजवीवर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशाशिवाय राजीव गांधी जीवनदायी योजनेतून सांजवीला जीवनदान मिळाले. आज ती स्वस्थ जीवन जगत आहे. आम्ही नशिबावर सोडून दिलेल्या सांजवीच्या जगण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेने नवीन प्राण ओतला. आज सांजवी हसतखेळत शाळेत जाताना पाहुन तिच्या भविष्याची चिंता मिटली, अशी बोलकी प्रतिक्रिया सांजवीची आई अंजू बडगे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
ंनशिबावर सोडलेल्या ‘सांजवी’ला आयुष्याचे दान
By admin | Published: November 18, 2015 12:49 AM