विविध प्रकारच्या फुलपाखरांची नोंद : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रमलाखनी : येथील ग्रीनफ्रेन्डस् नेचर क्लबद्वारे लाखनी शहरात बटरफ्लाय ट्रेल कार्यक्रम शेंदरे नर्सरी, रेस्ट हाऊस परिसर, बसस्टँड परिसर तसेच पूर्व लाखनी आणि बाजार समिती परिसरात घेण्यात आला. हा बटरफ्लाय ट्रेल कार्यक्रम देशभर ५० ठिकाणी विविध निसर्गसंस्थांच्या माध्यमातून राबविला जात असून यामध्ये लाखनी या ठिकाणाची नोंद ग्रीनफ्रेन्डस नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी केली. बटरफ्लाय ट्रेल या कार्यक्रमाचा उद्देश फुलपाखरांचे विविध जाती, त्यांच्या प्रकारांची ओळख, विद्यार्थी नागरिकांना व्हावी व त्याद्वारे फुलपाखरातील विविध प्रजातींचे संवर्धन व्हावे हा आहे. ग्रीन ग्रीनफ्रेन्डस माध्यमातून समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मी कन्या विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय सावरीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. लाखनी शहरात आयोजित या उपक्रमात प्रा.अशोक गायधने, अशोक वैद्य, सिद्धार्थ शाळेचे हरित सेना शिक्षक दिलीप भैसारे, राणी लक्ष्मी विद्यालयाचे हरित सेना शिक्षिका निधी खेडीकर, निसर्गमित्र शुभम बघेल, गुणवंत जिभकाटे, आदित्य शहारे, युवराज बोबडे यांनी पुढाकार घेऊन राणी लक्ष्मी विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अनेक रंगीबेरंगी, लहान मोठे आकाराचे फुलपाखरे, त्यांचे रंग, वैशिष्ट्ये, नर मादी रंग फरक, त्यांचे जीवनशैली, त्यांचे अवलंबित्व, वनस्पती, फुले इत् यादी माहिती त्यांना देण्यात आली. बटरफ्लाय ट्रेलमध्ये लाखनी शहरात २० प्रकारचे फुलपाखरू या निरीक्षण भ्रमंतीमध्ये आढळले. यामध्ये डॅनाईड एगफ्लाय, लेमन पॅन्सी, चॉकलेट पॅन्सी, ब्लू पॅन्सी, बॅरनेट, चिजबिल, प्लेन टायगर, स्ट्राईपड टायगर, टॉनी कोस्टर, कॉमन इव्हीनिंग ब्राऊन, कॉमन क्रो, ग्राम ब्लू, कॉमन सेरुलियन, कॉमन पिपरो, मॉटल्ड इमिग्रंट, कॉमन ग्रास येलो, कॉमन रोज, लाईम बटरफ्लाय, सेलर इत्यादी फुलपाखरांच्या प्रजातींचा समावेश यामध्ये आहे.या अभिनव अशा बटरफ्लाय ट्रेल उपक्रमाला ग्रीनफ्रेन्डस्चे अशोक वैद्य, मंगेश टांगले, सतीश पटले, तेजस्विनी भगवान, प्रा.अशोक गायधने, अथर्व गायधने तसेच भूषण धांडे, व्रजेश मेश्राम, स्वप्नील नागलवाडे,मयूर क्षीरसागर, सुजल धांडे, रोहित देशमुख, मयूर शहारे, श्रेयस शहारे, शुभम पटले व भावेश येडेकर, लक्ष्मी अतकरी, तनिशा सेलोकर, मयुरी गिऱ्हेपुंजे यांनी सहकार्य केले. बटरफ्लाय ट्रेलचा अहवाल राष्ट्रीय फुलपाखरु संस्था तसेच विदर्भ बटरफ्लाय ट्रेल समन्वयक प्रा.आशिष टिपले, पराग दांडगे यांचेकडे पाठविण्यात आला. अशा प्रकारचा कार्यक्रम भंडारा - गोंदिया जिल्ह्यात प्रथमच घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
ग्रीन फ्रेन्डस्तर्फे लाखनीत बटरफ्लाय ट्रेल कार्यक्रम
By admin | Published: March 12, 2017 12:51 AM