लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : भरधाव ट्रॅव्हल्सने मोटारसायकलला धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी ट्रॅव्हल्स पेटवून दिली. नागरिकांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र संतप्त नागरिकांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली.रमेश बाळकृष्ण पिलारे (२६) रा.खैरी पट असे मृताचे नाव आहे. तो आपल्या मोटारसायकलने चुलबंद नदीचा पुल पार करत असताना गुरूवारी रात्री ८ वाजता नागपूर ते अर्जुनी मोरगाव जाणाºया एका ट्रॅव्हल्सने त्याला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, रमेश जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती गावकऱ्यांना होताच घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हर्ल्स मधील सर्व प्रवाशांना खाली उतरून संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सला आग लावून दिली. काही क्षणात संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीच्या विळख्यात सापडली. त्यामुळे संपूर्ण ट्रॅव्हल्स भस्मसात झाली.या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना होताच त्यांनी घटनास्थही धाव घेतली. घटनास्थळावर शेकडो नागरिकांचा संतप्त जमाव जमलेला होता. ट्रॅव्हल्स चालकाला घटनास्थळी आणत नाही तोपर्यंत मृतदेह जाग्यावरून हलविणार नाही अशी भूमिका गावकºयांनी घेतली. गावकºयांचा संताप पाहून पोलिसांनी तेथून माघार घेतली.वृत्त लिहिस्तवर घटनास्थळावर शेकडो नागरिकांचा जमाव जमलेला होता. ट्रॅव्हल्स चालकाविरूद्ध प्रचंड रोष व्यक्त केला जात होता. पोलिसांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या मार्गावरून धावणाºया भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना नेहमी घडतात. परंतु त्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. याचाच संताप नागरिक व्यक्त करताना दिसत होते.अपघातात ठार झालेला रमेश पिल्लारे हा हमालीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. सायंकाळी काम आटोपून आपल्या घरी परत जात असताना त्याला ट्रॅव्हल्सने चिरडले. अपघाताची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. या घटनेने लाखांदूर येथील चुलबंध नदी परिसरात काही काळा तणाव निर्माण झाला.
लाखांदूर येथे ट्रॅव्हल्स पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 10:20 PM
भरधाव ट्रॅव्हल्सने मोटारसायकलला धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर गुरुवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी ट्रॅव्हल्स पेटवून दिली. नागरिकांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली होती.
ठळक मुद्देअपघातात दुचाकीस्वार ठार : चुलबंद नदीपुलावरील घटना, नागरिक संतप्त