वरठी (भंडारा) : पाणीपुरवठा केंद्रावर दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणाची गावात जोरदार चर्चा सुरू असून, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या विरुद्ध नागरिकांत असंतोष आहे. पाणीपुरवठा केंद्रावर दारूच्या बाटल्यांचा खच पडला असल्याचे वृत्त खरे असले तरी पाणीपुरवठा केंद्रातून गावकऱ्यांना पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने जैविक चाचणी करिता बॉटल वापरात असल्याची माहिती पाणीपुरवठा कर्मचारी अंकुश टिचकुले यांनी दिली. त्या बाॅटल त्यांनी स्वतः मोहाडी येथील कबाडी दुकानातून विकत आणल्याचे सांगितले.
जलशुद्धीकरण योजना वरठी ग्रामपंचायत २००१ पासून राबवत आहे. जलशुद्धीकरण योजनेच्या माध्यमातून गावातील नळधारकांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धीकरण केंद्रावर दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याच्या काही फोटो व व्हिडिओ झपाट्याने समाज माध्यमांवर व्हायरल झाला. पाणीपुरवठा सारख्या महत्वाच्या केंद्रावर दारूच्या बाटल्या असल्याच्या वृत्ताचे तीव्र पडसाद उमटले. केंद्रावर ओली पार्टी होत असल्याची चर्चा रंगू लागल्या. अनेकांनी या प्रकरणावर तीव्र नापसंती दर्शवली.
याबाबत माहिती घेतली असता जलशुद्धीकरण केंद्रावर नियुक्त कर्मचारी अंकुश टिचकुले यांनी घटनेचे वास्तव मांडले. पाणीपुरवठा केंद्रावर दारूच्या बाटल्या असल्याची कबुली त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याचे जैविक तपासणी करिता नमुने घेण्यासाठी वापरात असल्याचे त्याने सांगितले. दर महिन्याला पाण्याचे नमुने मोठ्या प्रमाणात तपासणीला पाठवावे लागत असते. बाटल्या कबाडीच्या दुकानातून स्वतः विकत आणल्याचे त्यांनी सांगितले. बाटल्यांबाबत पसरविलेले वृत्त अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.
सूड भावनेने केलेले कृत्य
गावात निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे असे प्रकरण समोर ठेवून बाऊ करण्याचा प्रकार आहे. माहिती मिळताच पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कर्मचारी दोषी असतील किवा केंद्रावर अनैतिक कामे होत असतील तर, दोषींवर निश्चित कारवाई करू अशी माहिती सरपंच श्वेता येळणे यांनी दिली. पाणीपुरवठा केंद्रावर असलेल्या बाटल्या पाणी संकलित करून नमुने तपासण्यासाठी वापरात असून व्यवस्थित खबरदारी घेऊन वापरात आणत असल्याचे त्यांनी सांगितले.