तिघांना अटक : नववर्षाच्या पर्वावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाईभंडारा : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात देशी व विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका वाहनाला पकडून तीन आरोपींच्या त्यांच्या ताब्यातून ५ लाख २३ हजार ४४८ रूपयांची दारू जप्त करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास पवनी-चंद्रपूर मार्गावर केली. याप्रकरणी योगेश्वर नानाजी गहाणे रा.वाढोणा (ता.नागभिड), विकास सुधाकर गेडाम रा.सिरपूर (ता.चिमूर) व खुशाल नारायण हटवार रा.तेलीमेंढा (ता.नागभिड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही चारचाकी वाहन एम.पी. २३ डी ८६६९ ने बेकायदेशीररीत्या देशी व विदेशी मद्य घेऊन चंद्रपूर जिल्ह्यात जात होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्या माहितीवरुन उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक आर.आर. उरकुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहनाला अडवून कारवाई केली. या तीन आरोपींना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. खुशाल हटवारला ८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक एन.एस. धुरड, व्ही.जे. माटे, जे.ए. अंबुले, एन.जी. कांबळे आर.आर. उरकुडे यांच्यासह विभागाच्या धाड पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)
सव्वापाच लाखांची दारु जप्त
By admin | Published: December 30, 2015 1:33 AM