▪ रोजीरोटीचा प्रश्न
लाखांदूर : कधी बाईचे, कधी देवाचे रूप धारण करणारा बहुरूपी समाज दारोदारी जाऊन भीक मागत असायचा. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगावात बहुरूपी समाजाची जवळपास १०० कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. या समाजातील बहुतेक लोक कधी बाईचे, कधी देवाचे रूप धारण करून दारोदारी जाऊन भीक मागायचा. या भिक्षेतून काही मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालवायचे. या समाजातील महिला वर्ग घरोघरी जाऊन गोधड्या शिवण्याचे काम करीत असतात. भिक्षेवर जगणाऱ्या या कुटुंबांतील नवयुवकांनी पारंपरिक पद्धतीला फाटा देत जमेल तो व्यवसाय करण्याचा मार्ग सुकर केला आहे.
बहुरूपी समाजातील अल्पशिक्षित तरुणांनी स्वबळावर गत चार ते पाच वर्षांपासून हंगामी व्यवसायाची सुरुवात केली आहे. सर्व कुटुंबातील तरुण वर्ग हंगामानुसार व्यवसाय करतो. यामध्ये प्लास्टिक खुर्ची, लोखंडी रॅक, स्टडी टेबल, ड्रम, बाज, मच्छरदानी या वस्तू ग्राहकांच्या गरजेनुसार बनवितात. प्रत्येकी कुटुंब महिन्याला ५० हजारांचा माल विकतेय. पहाटे ५ वाजता उठून हे लोक आपल्या दुचाकीवर साहित्य घेऊन दररोज ५० किलोमीटरचा प्रवास करतात. या मिळकतीतून संसाराचा गाडा चालवितात.
तथापि, लॉकडाऊन लागल्याने संचारबंदीचे आदेश निर्गमित होताच उन्हाळ्यात विक्रीसाठी बोलाविलेले लाखो रुपयांचे साहित्य त्यांच्या घरी तसेच पडून आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून व्यवसायात असणारे तरुण चिंतातुर अवस्थेत दिसत आहेत. उन्हाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्याची मागणी वाढत असते. त्यानुसार माल बोलविला जातो. सध्या ठोक माल जेथून आणला त्या व्यापाऱ्यांचे देणेही बाकी राहिले आहे. शिवाय घर चालविण्याची चिंता सध्या त्यांना सतावत आहे.
दरम्यान, येत्या पावसाळ्यापर्यंत लॉकडाऊन सुरू राहिले तर हा सगळा माल उघड्यावर पडून आहे तो खराब होईल, ही पण चिंता यांना सतावत आहे. शासनाकडून गहू व तांदूळ मोफत दिले जात असले तरी तेल, तिखट, मीठ यांसह अन्य जीवनावश्यक साहित्य विकत कसे घ्यावे, हा प्रश्न या समाजातील लोकांसमोर निर्माण झाला आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन बहुरूपी समाजाच्या समस्या ऐकून घ्याव्यात, अशी आर्त हाक या समाजातील नागरिकांनी दिली आहे.
===Photopath===
220521\img-20210522-wa0020.jpg
===Caption===
लॉकडाऊनपुर्वी साहित्य विक्रीस घेऊन जातांना बहुरुपी समाजातील एक युवक