लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील कोरंभी देवी येथे गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानासाठी मतदार रांगा लावून असल्याचे चित्र दिसून आले. संथगतीने मतदान प्रक्रिया होत असल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला.कोरंभी येथे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसत होती. मात्र मतदान केंद्रात एकच मशीन आणि मतदान प्रक्रिया अत्यंत मंद गतीने होत असल्याने नागरिक तासंतास रांगेत दिसत होते. सायंकाळी मतदानाची वेळ संपली. त्यावेळी सुमारे ३०० ते ३५० मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत होते. या सर्वांना टोकन देण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती. या रांगेत मोठ्या प्रमाणात महिलाही होत्या. परंतु रात्र होत असल्याने आणि घरी मुले वाट पाहत असल्याने महिला मतदान न करताच निघून गेल्याची माहिती आहे.कोरंभी देवी येथे पूर्वी झालेल्या निवडणुकीत दोन बुथ होते. परंतु यंदा एकच बुथ तयार करण्यात आले. गावाची लोकसंख्या बघता येथे दोन बुथची आवश्यकता होती परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी उशिरा रात्रीपर्यंत मतदार रांगेत होते. मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्ह्यातील बहुमांश मतदान केंद्रावर संथगतीने मतदान झाल्याच्या तक्रारी आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाची गतीही संथ दिसली. मतदानाची टक्केवारी तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळत होती. या सर्व प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Lok Sabha Election 2019; कोरंभीदेवी येथे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:05 PM