भंडारा : या वर्षात अनेक लाचखोरांना रंगेहात पकडल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे, अंतर्गत चौकशी यासारख्या माध्यमातून लाचखोरी रोखण्याचे उपाय शासनाने योजिले आहेत. मात्र लाचखोरांनी लाच स्वीकारणे कमी न करता लाच स्वीकारण्याच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. जसे रोख पैसे न घेता सुवर्ण अलंकार स्वीकारण्याचा नवा फंडा या लाचखोरांनी निवडला आहे. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश आहे. शासनाने भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. विविध शासकीय कार्यालयाील अधिकारी व कर्मचारी या कारवाईमध्ये पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले जातात. अलीकडे अशा प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे लाचखोर अधिकारी व कर्मचारी सावध झाले आहेत. त्यांनी आता रोख रक्कम स्वीकारण्याऐवजी परस्पर मोठ्या पेढीतून सुवर्ण अलंकार आणने पसंत केले आहे. ज्याचे काम करावयाचे आहे. त्याला सुवर्ण अलंकार मागविले जाते. या व्यवहारात कोणत्याही नोंदी किंवा पावती दिल्या जात नाही. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडणे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यासमोर आव्हान आहे.भंडारा जिल्ह्यात मागील सहा महिन्यांपासून बुकींचे प्रस्थ वाढले आहेत. प्रामुख्याने वाळुमाफिया व अवैध धंद्यामधील व्यक्ती व ओव्हरलोड ट्रकची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीव्दारा एजंटच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुवर्ण अलंकार भेट देण्याची चर्चा आहे. याचेच अनुकरण अन्य अधिकारी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
लाचखोरांनी शोधली सुवर्ण भेटीची पळवाट
By admin | Published: December 29, 2014 11:37 PM