तुमसर : तुमसर शहरातील बजाजनगर येथे अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत निरीक्षक वैद्य मापनशास्त्र (वजने व मापे) कार्यालय मागील काही महिन्यांपासून बंद पडले आहे. शहरातील भाजी मंडई व्यवसाय, किराणा दुकान, अन्नधान्य, फळ विक्रेते व फेरीवाले यांच्याकडून वजने व मापेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचे दिसून येत आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत निरीक्षण वैद्य मापनशास्त्र (वजने व मापे) या कार्यालयाला नियंत्रणाची जबाबदारी आहे; परंतु बऱ्याच महिन्यांपासून कार्यालय बंद अवस्थेत असल्याने दुकानदार व व्यापाऱ्यांकडून वजने व मापेत सर्रासपणे ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जर एखाद्या ग्राहकाने कोणतीही वस्तू एक किलो खरेदी केली, तर त्यामध्ये फक्त आठशे ग्राम माल मिळतो, तसेच काही दुकानदार व व्यापारी आजही शासनाचा महसूल बुडवत आहेत. कारण त्यांचे वार्षिक नूतनीकरण होत नाही आणि अवैधरीत्या वजने व मापे हाताळत असल्याचे आढळून येते.
संबंधित कार्यालय बंद असल्यामुळे अधिकारी व दुकानदार यांच्यात काही देवाण-घेवाण तर नाही ना अशी शंका ग्राहकांमध्ये निर्माण होत आहे. शिवसेनेने याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांना याबाबत निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली. ग्राहकांची होणारी आर्थिक लूट तत्काळ थांबविण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, शाखाप्रमुख निखिल कटारे, अरुण डांगरे, तुषार लांजेवार, सतीश बन्सोड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.