सध्या देशात कोरोना सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शाळा/महाविद्यालय बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण देणे सुरू आहे, विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून शिक्षण देणे शक्य नसल्याने शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर लिंक पाठवून त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जाते.
परंतु शिक्षकांकडून पाठविण्यात आलेली लिंक नेटवर्कच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांना गावाबाहेर मोकळ्या जागेत झाडाखाली जाऊन अभ्यास करावा लागतो. चिखली गावाची लोकसंख्या सुमारे १५०० च्या आसपास असून गावात एका विशिष्ट कंपनीचे जवळपास ७०० ते ८०० ग्राहक आहेत. शालेय विद्यार्थ्यांसोबतच गावातील सर्वसामान्य लोकांना सुद्धा याचा मनस्ताप सहन करावा लागतो .गावकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा संयोजक राजेश वाघमारे यांनी मागील ६ महिन्यांपूर्वी जिल्हा पातळीवर असलेल्या भंडारा येथील एका कंपनीच्या कार्यालयात जाऊन गावातील नेटवर्कच्या समस्येविषयी माहिती सांगितली. तिथे कार्यरत असलेल्या त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लोकेशन तपासणी केली असता खरोखरच चिखली गावामध्ये नेटवर्क नसल्याचे दिसून आले. त्यामुळे समस्या घेऊन गेलेल्या राजेश वाघमारे यांना तिथल्या कर्मचाऱ्यांनी आश्वस्त केले की १ महिन्याच्या आत चिखली गावामध्ये आमच्या कंपनीचे मोबाईल टॉवर उभारले जाईल, परंतु आता या घटनेला ६ महिने होऊन सुद्धा अद्याप नेटवर्ककरिता टॉवरचे काम सुरू झालेले नाही म्हणून पुन्हा एकदा समस्त चिखली ग्रामवासीयांच्या वतीने राजेश वाघमारे यांनी टॉवर उभारणीसाठी भंडारा तहसीलदार आणि भंडारा / गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे व भंडारा / गोंदिया विधान परिषदेचे आमदार तथा माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांना निवेदन दिले.