भंडारा : महिनाभरापूर्वी वाट चुकून भंडारा रात्रीच्यावेळी दाखल झालेल्या तरुणीला पाेलीस आणि सखी वनच्या महिनाभराच्या परिश्रमानंतर तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. पाेलिसांना चुकीची माहिती दिल्यानंतरही पाेलिसांनी माेठ्या परिश्रमाने तिच्या घरचा पत्ता शाेधून आई-वडीलांच्या हवाली केले. तेव्हा कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद गगणात मावत नव्हता.
भंडारा येथील वैनगंगेच्या पुलाजवळ १ नाेव्हेंबरच्या रात्री १० वाजता १९ वर्षीय तरुणी पाेलिसांना निरश्रीत अवस्थेत दिसून आली. तिची विचारपूस केली असता ती छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथील असल्याचे सांगितले. तसेच एका ट्रक चालकासाेबत ती भंडारात आल्याचेही सांगत हाेती. पाेलिसांनी तिला याेग्य मदत मिळावी म्हणून ठाण्यात आणले. तसेच सखीवन स्टाॅप सेंटरला माहिती दिली. या तरुणीला सखीवन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला काेणतीच माहिती देत नव्हती. याेग्य समुपदेशन करुन घरची माहिती घेतली. परंतु तिने दिलेला पत्ता चुकीचा निघाला. परंतु अशा परिस्थितीतही सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी हार मानली नाही. सतत महिनाभर प्रयत्न सुरु ठेवला शेवटी सेंटरच्या प्रशासक लता भुरे, अरविंद हलमारे यांनी पाेलिसांच्या मदतीने तरुणीला घेवून दुर्ग गाठले. त्यांच्यासाेबत सेंटरचे कर्मचारी संजय नागाेसे, राेशनी भाजीपाले ही हाेते. स्थानिक पाेलिसांच्या मदतीने तिच्या घरच्यांचा शाेध घेतला.
अखेर तिला तिच्या आई-वडीलांच्या हवाली करण्यात आले. यासाठी पाेलीस अधीक्षक वसंत जाधव अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील, भंडाराचे ठाणेदार सुभाष बारसे, हवालदार राजु हाके, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी तुषार पवनीकर, प्रकल्प समन्वयक विजय राेकडे यांनी सहकार्य केले.
तरुणी देत हाेती घरचा चुकीचा पत्ता
घाबरलेल्या अवस्थेत असलेली तरुणी सुरुवातीला काहीच माहिती देत नव्हती. मात्र नंतर सांगितलेला पत्ताही चुकीचा निघाला. त्यामुळे सेंटरच्या अधिकाऱ्यांनी तिला घेवून दुर्ग गाठले. दुर्ग पाेलिसांच्या मदतीने तरुणीच्या सांगण्यानुसार परिसरात घेवून गेले. त्यावेळीही अपयश आले. त्याचवेळी पाेलिसांनी हरविल्याची कुठे तक्रार आहे का याचा शाेध घेतला. माेहन नगर पाेलीस ठाण्यात तरुणीच्या हरविल्याची तक्रार हाेती. त्यावरुन घर गाठले व मुलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.