भंडारा : मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर कुटुंबातील सदस्याचा पराभव झाला. जिल्हा पातळीवरून पाठविलेले पैसे बुथवर न पोहोचल्यानेच पराभवाचे शल्य बोचलेल्या एका जिल्हा परिषद सदस्याने पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना खडेबोल सुनावले आहे. उल्लेखनीय म्हणजे, यासंबंधी ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून, जिल्हाध्यक्षांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे.
रविवारी मतदानापूर्वी गावागावांत एकेका मतासाठी पैसे मोजण्यात आल्याची चर्चा होती. तर कुठे कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी नोटाही जप्त केल्या. मात्र, ग्रामीण भागात जिल्हा पातळीवरून आलेल्या पैशांची विल्हेवाट योग्य प्रकारे न लागल्याने त्याचा फटका एका ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्याला बसला. त्यातच हा उमेदवार एका जिल्हा परिषद सदस्याच्या कुटुंबातील असल्याचे समोर आले. मंगळवारी मतमोजणीनंतर ज्या ठिकाणी मते मिळाली नाहीत तिथे वाटणाऱ्याने पैसे वाटलेच नाही, ही बाब उजागर झाली. यावरूनच संतापलेल्या जिल्हा परिषद सदस्याने थेट पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना फोन करून चांगलेच धारेवर धरले.
काय आहे ऑडीओ क्लिपमध्ये
साहेब, तुम्ही माझ्या विरोधी बरीच कामे केली आहेत. मला सर्व ठाऊक आहे. १६ ऐवजी ३२ साठी पैसे यायला हवे होते. परंतु मध्यस्थीने पैसे वाटलेच नाहीत. पाठपुरावा केला तर वाटप केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात निवडणुकीसाठी पक्षाकडून आलेला पैसा बुथवर पोहोचलाच नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी असताना गौडबंगाल करून बतावणी करू नका, असे खडेबोल सुनावले आहे. उल्लेखनीय म्हणजे, ही सर्व बाब बोलताना शिव्यांची लाखोलीही वाहण्यात आली आहे. ही ऑडीओ क्लिप समाजमाध्यमात चांगलीच व्हायरल झाली असून, याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर पक्ष काय कारवाई करते याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पैसे वाटपावर शिक्का मोर्तब
कुठलीही निवडणूक पैशाशिवाय होत नाही. या बाबीवर ऑडीओ क्लिपने जाहीरपणे शिक्का मोर्तबच केले आहे. पोलिस प्रशासन किंवा निवडणूक विभाग कितीही सतर्क असला तरी पैशाचे व अन्य साहित्यांचे आमिष दाखविले जाते. तसेच त्याचे वाटपही केले जाते. ग्रामीण भागात पैसा आणि दारू यावरच मताधिक्याचे गणित शेवटच्या घडीला अवलंबून असल्याचे या बाबींवरून स्पष्ट झाले आहे.