लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : दोघांची मने जुळली. पुढे दोघेही प्रेमात गुरफटले. प्रेमातच त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दोन वेगवेगळ्या जातीच्याविरोध असल्याने तरुणाने आईला सोबत घेत तंटामुक्त गाव समिती समोर कैफियत मांडली. अखेर तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगलाने संसार थाटला.ग्राम चिचाळ येथील लंकेश्वर आत्माराम शास्त्रकार (२८) हा युवक लाखांदूर तालुक्यातील दोनोळा येथे मावशी नलू टरवटकार यांच्याकडे पाहुणा म्हणून गेला. मावशीच्या घराशेजारील सलीता मेश्राम (१९) या तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र जातीचे बंधन असल्याने घरच्या मंडळींनी विरोध केला. लंकेश्वर यांनी सलीताच्या आई वडीलांची भेट घेतली व लग्नाची मागणी घातली. त्यांनी प्रतिसाद न दिल्याने लंकेश्वर यांनी आईसोबत तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, सरपंच लोपमुद्रा वैरागडे, उपसरपंचा मंजुषा गभणे यांनी लग्नाची विनंती केली. यावेळी तंटामुक्त समितीने वधू-वराची सखोल चौकशी करुन नकारात्मक बाजूचा विचार सोडून सकारात्मक भुमिका घेवून रितीरिवाजाप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत लग्न लावले. चिचाळ येथील महात्मा गांधी गाव तंटामुक्त समितीचे हे ११ वे प्रेमियुगलांचे लग्न सोहळा पार पडला आहे. याप्रसंगी तंमुस अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, सरपंच लोपमुद्रा वैरागडे, उपसरपंच मंजुषा गभणे, मोना तिभागेवार, मनोज वैरागडे, पो.पा. तुकेश वैरागडे, शामलाल रामटेके, वासुदेव लेंडे, घनश्याम भाजीपाले, महादेव उके, रवेश उके, शंकर मांडवकार, मुखळू गडकर, रुपचंद उके, रामकृष्ण घटारे, अल्का काटेखाये, प्रियंका काटेखाये, दिलीप रामटेके उपस्थित होते.
प्रेमीयुगलाने थाटला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:58 PM