मोहन भोयर
तुमसर (भंडारा) : तुमसर तालुक्यातील माडगी व सुकळी येथील वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्करांनी बेसुमार अवैध रेतीचा उपसा करून नदीपात्र पोखरून काढले आहे. माडगी येथे तर संपूर्ण घाटात रेतीच शिल्लक उरली नाही. रेती तस्कर हे स्थानिक असल्याची माहिती असून त्यांना महसूल प्रशासनाचा आशीर्वाद प्राप्त असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सुकडी (दे.) येथील रेती घाटातून नियमितपणे रेतीचा उपसा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग शेजारी माडगी येथे वैनगंगा नदीचे मोठे पात्र आहे. येथील पात्रातून बेसुमार रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येथील नदीघाट लिलाव झाला नाही. नदीच्या प्रवाह गावाच्या दिशेने येत असल्याने येथील नदीपात्र हे लहान झाले आहे. नदीपात्रातून बेसुमार रेतीच्या उपसा केल्याने या नदीपात्रात केवळ आता मातीचा थर उरला आहे. नदीपात्र पोखरल्याचे चित्र येथे दिसत आहे. परंतु महसूल प्रशासनाने येथे अजूनपर्यंत मोठे कारवाई केली नाही.
राज्य शासनाचा महसूल येथे बुडाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर पैनगंगा नदीचे पात्र असून येथे अधिकाऱ्यांचेही येणे जाणे असते परंतु त्यांनी येथे अर्थकारणामुळे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नदीपात्रात रेती नसल्याने पावसाळ्यात या गावाला आता धोका निर्माण झाला आहे. माडगी येथे वैनगंगा नदीपात्रात तीर्थस्थळ आहे. त्याला येथे आता धोका दिसून येत आहे. माडगी येथिल नदीपात्रात मंदिर परिसरात मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पाण्याचा प्रभाव येथे या खड्ड्यामुळे अल्प प्रमाणात वाहत आहे. रेतीची चोरी करणाऱ्यांशी कोण वाद घालणार असा प्रश्न नागरिकांसमोर उभा होता. ग्रामपंचायत प्रशासनही येथे मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येते.
सुकळी घाटातून वाहतूक
सुकळी (दे.) या घाटावरील सध्या रेती तस्करांचा ताबा असल्याची माहिती आहे. रात्री या घाटातून रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. या घाटाकडेही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. येथील रेती तस्कर गब्बर झाले आहेत. तस्करांच्या मुजोरीपुढे ग्रामस्थांचेही काही चालत नाही. या रेती तस्करांची तक्रार केल्यानंतर उलट त्यांची नावे सांगितली जातात. त्यामुळे त्यांची तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही.