तुमसर : सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे माडगी ग्रामपंचायतीने गावातील रुग्णांकरिता ऑक्सिजनच्या पाच सिलिंडरची व्यवस्था केली. त्या रुग्णांना घरीच ऑक्सिजन लावण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माडगीचे सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, उपसरपंच संजय अटराये व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातील कोरोना रुग्णांकरिता ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, याकरिता प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळाले. या गावाच्या शेजारीच युनी डेअरी डेंट नावाचा कास्टिंग प्लांट आहे. तेथील अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन सिलिंडर देण्याची विनंती केली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी माडगी ग्रामपंचायतीला ऑक्सिजनचे पाच सिलिंडर तत्काळ दिले. त्यामुळे गावातील रुग्णांना गावात ऑक्सिजनची सोय उपलब्ध झाली.
माडगी येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन सिलिंडरला लागणारे उपकरण उपलब्ध केले. त्या माध्यमातून गरजू रुग्णांना येथे ऑक्सिजन उपलब्ध झाले. या कार्याची पंचक्रोशीत सध्या चर्चा सुरू आहे.
कारखान्याचे सामाजिक दायित्व : माडगी येथे युनी डेअरी डेन्ट कास्टिंग प्लांट आहे. येथील व्यवस्थापनाने तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयाला ६० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. माडगीचे सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, सरपंच संजय अटराये व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मागणीनुसार ऑक्सिजनचे पाच सिलिंडर उपलब्ध करून दिले. याकरिता कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी नेरकर, चक्रवर्ती, भांडारकर यांचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.