मोहाडी तालुक्यातील वरठी हे अवैध धंद्यांचे माहेरघर आहे. राज्यातील विविध जिल्हे व अन्य राज्यात गांजा व इतर साहित्याची तस्करी वरठी येथून होते. घराघरांत अवैध धंदे जोमात सुरू आहेत. गांजा व नशा करणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात सर्रास विकले जातात. मटका व्यवसाय चालवणारे मुख्य सूत्रधार व अवैध मोहफुल दारू उत्पादक मोठ्या प्रमाणात गावात आहेत. अवैध धंद्यांत मोठ्या प्रमाणात कमाई असल्याने शेकडो युवक याकडे वळत आहेत. या धंद्यांतून होणारी कमाई आता सार्वजनिक कार्यक्रम व स्पर्धेत खर्ची करून गावात वातावरण निर्मिती सुरू आहे. गावातील शेकडो अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेली असून, अनेक भागांत नशा करणाऱ्या तरुणांच्या हुल्लडबाजीने नागरिक त्रासले आहेत.
दोन महिन्यांपासून गावात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजनाची गती वाढली आहे. या स्पर्धांना माफियांकडून मोठ्या प्रमाणात फंडिंग सुरू आहे. गावातील तरुणाईला वाम मार्गी लावून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणारी ही मंडळी आयोजकांच्या गळ्यातील मात्र ताईत ठरत आहे. गत आठवड्यात रोख बक्षिसांची भव्य स्पर्धा होती. या स्पर्धेत आयोजकांनी माफियांकडून भरपूर देणगी घेतली होती. ही काही पहिली स्पर्धा नाही. यापूर्वीही अनेक स्पर्धांना अवैध व्यावसायिकांकडून पैसे वसुली करून बक्षिसे वाटण्यात आली. त्यांना मानसन्मानाने व्यासपीठावर बसवून आदरातिथ्य करण्यात आले आहे. पण, नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेने तर कळस गाठल्याचे दिसले. प्रतिभावंत महिला-पुरुष खेळाडूंकडून चरणस्पर्श करून घेणे व इनामाची रक्कम त्यांच्या हाताने वाटण्याच्या सूचना आयोजक चक्क माइकमधून करताना दिसले.
बॉक्स
...आणि त्यांनी पळ काढला
उद्घाटन कार्यक्रमात परिसरातील प्रतिष्ठित पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेतील खेळाडूंचे प्रावीण्य पाहून अनेक जण थांबले होते. स्पर्धा जसजशी रंगात आली तसतशी व्यासपीठावर गर्दी वाढू लागली. ओरडाओरड व घोषणा यांसह भाईगिरीला उधाण आले. सुरुवातीला कुणाच्या लक्षात आले नाही. पण, त्यांचा वाढता हस्तक्षेप व नागरिकांची धुसफुस लक्षात येताच त्यांनी तेथून हळूहळू काढता पाय घेतला.
पोलिसांची भूमिका घातक
वरठी व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. या व्यवसायांत असलेल्या माफियांचा गावात खुलेआम वावर आहे. यापैकी अनेकांची पोलिसात चलती आहे. काही जण अधिकाऱ्यांच्या जवळचे आहेत. एकंदरीत गावात अशांतता आहे. यांचा अतिरेक वाढल्याने महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. गावातील शेकडो युवक व्यसनांच्या आहारी गेले असून, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांची भूमिका नागरिकांसाठी घातक व अवैध धंद्यांना पोषक ठरत आहे.
अट्टल गुन्हेगारांचे माहेरघर
वरठी हे गाव अट्टल गुन्हेगारांचे माहेरघर आहे. इतर जिल्ह्यांतील अनेक तडीपार गुंडांचे वास्तव्य वरठी येथे आहे. बदमाशांच्या यादीत असलेल्या अनेक गुंडांची मोठमोठी पोस्टर पोलिसांच्या निगराणीत येथे चौकाचौकांत झळकत आहेत. स्थानिक लोकांच्या मदतीने गावात गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांचा वावर सुरू आहे. त्यांच्या मदतीने तक्रारदारांना धमकावणे व जुन्या तंट्यातून हल्ले करण्यासारखे प्रकार वाढले आहेत.