कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून ३१ डिसेंबर २०२० पूर्वी महाडीबीटी पोर्टलमार्फत ऑनलाईन अर्ज मागविले होते. मात्र, यामध्ये ऑनलाईन अर्ज करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांमधून या योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. यासाठी जिल्हा कृषी विभागानेदेखील आयुक्तालयाकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत शासनाने अखेर महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज करण्यासाठी १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरीपूर्व संमती देणे, प्रक्रिया तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट महाडीबीटीद्वारे अनुदान वितरित करणे आदी सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता भासणार नाही. लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी हवा तो बदल करू शकतात. शेतकऱ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.
याबाबत शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी योगेश मेहर यांच्याशी संपर्क साधण्याची आवाहन केले आहे.
बॉक्स
असा करा अर्ज
कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर आता शेतकऱ्यांना एकात्मिक संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार विविध बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकरी स्वतःचा मोबाईल क्रमांक, संगणक सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील सेवा केंद्र अथवा सीएससी केंद्रावरून अर्ज भरू शकणार आहे. यामध्ये वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.