लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : ओबीसी पायलट प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांवर महाज्योती व संबंधित संस्थेमार्फत घोर अन्याय करण्यात आला आहे. अन्यायग्रस्त विद्यार्थी उपराजधानी नागपूर शहरात तीन दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. अन्नपाण्याविना आत्मक्लेश करून न्यायाची मागणी करीत आहेत. मात्र, शासनाने अद्यापही दखल घेतली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घ्यावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन गुरुवारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ओबीसी सेवा संघाच्या वतीने पाठविण्यात आले आहे.
संविधान चौक नागपूर येथे वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या महाज्योती संस्थेचे १४ ओबीसी विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. १ नोव्हेंबर २०२२ ला वैमानिक प्रशिक्षण सुरू झाले. हे प्रशिक्षण १८ महिन्यांचे होते. प्रशिक्षण नागपूर येथील फ्लाईंग क्लब येथे सुरू आहे. या फ्लाईंग क्लबच्या ट्रस्टी नागपूर विभागीय आयुक्त आहेत. या प्रशिक्षणासाठी प्रति विद्यार्थी २५ लाखप्रमाणे ५ करोड रुपये फ्लाईंग क्लब नागपूर यांना देण्यात आलेले आहेत. या प्रशिक्षणात २०० तास हवाई उड्डाण होणे आवश्यक आहे. हवाई उड्डाण तास पूर्ण झाल्यानंतरच सी.पी.एल. अभ्यासक्रम पूर्ण होतो. यानंतरच विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. परंतु, मागील दोन वर्षांत अनेक विद्यार्थ्यांचे नगण्य हवाई उड्डाण तास प्रशिक्षण झाले. विद्यार्थ्यांनी अनेक वेळा महायुती आणि नागपूर फ्लाईंग क्लब यांना निवेदने दिली. विभागीय आयुक्त, फ्लाईंग क्लब नागपूर, महाज्योती आणि विद्यार्थी व पालक यांच्या अनेकदा बैठका झाल्यात. परंतु, उड्डाण तास अद्यापही पूर्ण झाले नाहीत.
निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, भय्याजी लांबट, प्रभाकर वैरागडे, संजीव बोरकर, रोशन उरकुडे, रमेश शहारे, अरुण जगनाडे, भाऊराव वंजारी, मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, शुभदा झंझाड, लता बोरकर, लक्ष्मण ईश्वरकर, मनिराम साखरकर, पंजाब कारेमोरे, श्रीपत भुरे, मेघराज बोंदरे, गोपाल देशमुख, राजू वंजारी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे २०० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करा वैमानिक प्रशिक्षण खासगी संस्थांमध्ये एक वर्षाचे आहे. असे असताना नागपूर फ्लाईंग क्लबने २३ महिन्यांतही हे प्रशिक्षण पूर्ण केले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नागपूर फ्लाईंग क्लबवरील विश्वास उडाला आहे. वेगळे प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण पूर्ण करावे, अशी मागणी आहे.