ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील तीनही विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत. लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित मताधिक्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तर ऐकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात दोनही काँग्रेसला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. शिवसेनेने भंडारा विधानसभेवर दावा केला असून युतीचे अद्यापही स्पष्ट नसल्याने ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत तीनही जागांवर भाजपने विजय मिळविला होता. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला तिनही विधानसभा क्षेत्रात भाजपलाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे तुमसर, भंडारा आणि साकोली या तिनही ठिकाणी भाजपचा दावा आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. तिनही विद्यमान आमदारांनी तिकीटासाठी दावा केला असून गत काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे.भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपचे रामचंद्र अवसरे या मतदार संघाचे आमदार आहेत. २००९ च्या निवडणुकीत युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. त्यामुळे युती झाल्यास या मतदार संघावर शिवसेनेचा दावा राहणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे.साकोली मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून राजेश काशीवार आमदार आहेत. येथे भाजपमध्ये अनेकजण इच्छूक असल्याने कुणाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. काँग्रेसच्या राज्यस्तरीय प्रचार समितीचे प्रमुख असलेले नाना पटोले येथून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे.तुमसर विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार चरण वाघमारे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक राजकारण तुमसर मतदारसंघात तापले आहे. विद्यमान आमदारांनी तिकीटासाठी दावा केला असला तरी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लागले आहे. येथेही भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतरच या मतदार संघाचे चित्र स्पष्ट होईल.भंडारा जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व आहे. आघाडीत त्यांची भूमीका महत्वाची ठरणार आहे.तीनही मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी ते कोणती व्युहरचना आखतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्यावर आपली चांगली पकड निर्माण केली आहे. तिकीट वाटपासोबतच प्रचारात त्यांची महत्वाची भूमीका राहणार आहे. एकंदरीत तीनही मतदार संघात युतीमध्ये प्रतिष्ठेसाठी तर आघाडीत अस्तित्वासाठी लढाई होणार आहे.पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाचीजिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांची विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात भाजपने विजय संपादित केला होता. विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांना राज्यमंत्री पदासोबत भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले. आता विधानसभा निवडणुकीची सर्व जबाबदारी भाजप त्यांच्या खांद्यावर देणार, यात कुणालाही शंका नाही.नाना पटोले यांची लागणार कसोटीभाजप खासदारकीचा राजीनामा देवून काँग्रेसवासी झालेले माजी खासदार नाना पटोले यांची विधानसभा निवडणुकीत मोठी कसोटी लागणार आहे. गत निवडणुकीत काँग्रेसला एकाही ठिकाणी विजय संपादित करता आला नव्हता. त्यामुळे काँगे्रसला स्पर्धेत आणण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे.वंचित, बसपाचे काय?लोकसभा निवडणुकीत बसपाच्या उमेदवार डॉ. विजया नंदुरकर यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. तर वंचित आघाडीने चवथ्या क्रमांकाची मते मिळविली होती. आता विधानसभेच्या तोंडावर विजया नंदुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीत आणि बसपाची भूमिका महत्वाची राहणार आहे.
Maharashtra Assembly Election 2019 (18062) - युतीसाठी प्रतिष्ठेची; आघाडीची अस्तित्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 6:00 AM
स्पष्ट नसल्याने ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत तीनही जागांवर भाजपने विजय मिळविला होता. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला तिनही विधानसभा क्षेत्रात भाजपलाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे तुमसर, भंडारा आणि साकोली या तिनही ठिकाणी भाजपचा दावा आहे.
ठळक मुद्देविधानसभा रणांगण : प्रफुल्ल पटेल, परिणय फुके, सुनील मेंढे, नाना पटोले यांच्या नेतृत्वाची कसोटी