लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरूवातीला तिरंगी लढतीचे चित्र असलेल्या साकोली मतदारसंघात आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी थेट लढत होत आहे. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यापुढे वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांना मिळणारी ‘निष्ठावंतां’ची सहानुभूती काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरत आहे. साकोलीतील या बदलत्या समीकरणाची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात चर्चा होत आहे.साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे चित्र एकदम बदलल्याचे दिसत आहे. होम ग्राऊंडवर काँग्रेस उमेदवार नाना पटोले आता अडचणीत आल्याचे चित्र आहे. उमदेवारी दाखल करायाची आणि साकोली कार्यकर्त्यांच्या भरवशावर सोडून राज्यात प्रचाराला निघायचे असे नियोजन नाना पटोले यांचे होते. मात्र मतदारसंघातील ढासळता बुरूज पाहून त्यांचा पाय साकोली मतदारसंघाबाहेर निघत नाही. राज्यात सोडा भंडारा जिल्ह्यातही इतर मतदारसंघात त्यांची सभा झाली नाही. यावरून त्यांच्यापुढे किती मोठे आव्हान भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने उभे केले याचा अंदाज येतो.वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांनी गावागावांत आपली पकड निर्माण केली आहे. थेट काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देत आपली भूमिका सांगत आहेत. त्यांना मिळणारा वाढता प्रतिसादच या निवडणुकीचे चित्र बदलविणारे आहे.भाजपचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी सुरवातीपासूनच मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. गावागावांत त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भाजपसाठी संजीवनी ठरत आहे. सुरवातीला तिरंगी असलेल्या साकोलीची लढत आता भाजप आणि वंचित बहुजन आघाडीत होत आहे.दुटप्पी धोरणाचा काँग्रेसला फटकाकॉग्रेस उमेदवार नाना पटोले काँग्रेसचे राज्य प्रचार प्रमुख आहेत. राज्यभर प्रचारासाठी जावे लागणार असल्याने आपण विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी सुरवतीला भूमिका घेतली होती. त्यांनी उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्जही केला नाही. तसेच मुलाखतही दिली नाही. त्यामुळे काँग्रेसकडून तिकीटासाठी अनेकजण उत्सुक होते. त्यांनी निवडणुकीपुर्वी मतदारसंघात बांधणी करण्यास सुरूवात केली होती. त्यात मोठा खर्च झाला. मात्र वेळेवर नाना पटोले यांनी रिंगणात उडी घेतली. त्यांच्या या दुटप्पी धोरणाचा फटका या निवडणुकीत बसत असून माजी आमदार सेवक वाघाये यांनी त्यात उघड भूमिका घेतली.
Maharashtra Election 2019 ; साकोलीत भाजप आणि वंचितमध्ये थेट लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
साकोली मतदारसंघात भाजपचे डॉ.परिणय फुके, वंचित आघाडीचे सेवक वाघाये, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. सुरूवातीला या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र होते. साकोलीकडे सर्व विदर्भाचे लक्ष लागले होते. मात्र गत दोन दिवसात येथील लढतीचे चित्र एकदम बदलल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देकाँग्रेस अडचणीत : बदलत्या समीकरणाची सर्वत्र चर्चा