लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेले भंडारा विधानसभा मतदारसंघातील चार मतदान केंद्र शॅडो झोनमध्ये आहेत. येथे डाटा फीडिंगसाठी पोलिसांच्या वायरलेसची मदत घेतली जाणार आहे.भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोलीसच्या वायरलेस प्रणालीचा उपयोग करुन डाटा फीडिंग केली जाणार आहे. मतदानात कोणतीही अडचण येवू नये यासाठी प्रशासन पुर्ण सज्ज झाले आहे.भंडारा जिल्ह्यात १९ क्रिटीकल मतदान केंद्र असून या सर्व केंद्रावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. तर प्रत्येकी सात सखी आणि आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. सखी मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील १२५ मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग (थेट चित्रीकरण) केले जाईल. जिल्ह्यातील निवडणुका पारदर्शक पध्दतीने व निर्भिडपणे होण्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यात ५२७० दिव्यांग मतदार आहेत. त्यात तुमसर १२८१, भंडारा १४६३, साकोली २५२६ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. मतदान करणे सोईचे व्हावे यासाठी ५५४ व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून ९८२ दिव्यांग मित्र याठिकाणी मदतीला राहणार आहे. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी बीएलओकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.मतदारांसाठी सी-व्हिजेल अॅपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून आतापर्यंत प्रशासनाला या माध्यमातून सात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रार निवारणासाठी मदत केंद्र सुरु करण्यात आले असून मतदारांना १९५० या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे. रविवारी जिल्ह्यातील १२०६ मतदान केंद्रावर पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या. यासाठी १२२ एसटी बस, १२ स्कूल बसची मदत घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी ३९१ वाहनांचा वापर केला जाणार असून त्यात शासकीय व खाजगी जीपचा समावेश आह.े
Maharashtra Election 2019 ; इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसलेले चार मतदान केंद्र ‘शॅडो झोन’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:00 AM
भंडारा मतदारसंघातील नवेगाव (कोका), चंद्रपूर, सर्पेवाडा आणि दुधाळा मतदान केंद्र जंगलव्याप्त परिसरात तेथे इंटरनेटची कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे प्रशासनाने या केंद्रांना शॅडो झोनचा दर्जा दिला आहे. डाटा फीडिंग करताना अडचण निर्माण होणार असल्याने येथे पोलीसच्या वायरलेस प्रणालीचा उपयोग करुन डाटा फीडिंग केली जाणार आहे.
ठळक मुद्देडाटा फीडिंगसाठी पोलीस वायरलेसची मदत : भंडारातील नवेगाव, चंद्रपूर, सर्पेवाडा व दुधाळा केंद्राचा समावेश