ज्ञानेश्वर मुंदे/ संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ‘भारत माता की, भारत माता की, नमामी वैनगंगे, नमामी चुलबंद. सर्व बंधू-भगिनींना माझा नमस्कार, झाडीपट्टीतील सर्व धान उत्पादक शेतकरी बंधू-भगिनींना माझा विशेष नमस्कार. यावर्षी धानाची फसल चांगली आहे ना. खरंच! देवेंद्रजींनी धानाला बोनस दिल्याने आपण खूश आहात ना.’ असा थेट मराठीतून संवाद साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकोली येथील आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि सभास्थळी ‘मोदी है तो मुमकीन है’ असा सभास्थळी एकच आवाज झाला.भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित होती. खचाखच भरलेल्या मैदानात मोदींना ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. बरोबर २.५५ मिनीटांनी नरेंद्र मोदींना घेवून येणारे हेलिकॉप्टर साकोलीच्या आकाशात दिसू लागले. हवाईदलाचे तीन हेलिकॉप्टर सभास्थळाच्या मागच्या बाजुने तयार केलेल्या हेलिपॅडवर उतरले. काही क्षणातच मोदींचे सभामंचावर आगमन झाले. त्यावेळी उपस्थितांतून मोदी-मोदी असा नारा ऐकायला येवू लागला. उपस्थित जनसमुदायाला अभिवादन करीत पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. अस्खलित मराठीतून भाषणाची सुरुवात केली. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जीवनवाहिनी असलेल्या वैनगंगा आणि चुलबंद या नद्यांना नमन करुन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. एवढेच नाही तर भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या धानाबाबत चौकशीच केली नाही तर बोनसबाबत विचारुन आपण खुश आहात ना, असा सवाल केला. त्यावेळी नागरिकांतून आम्ही खूश आहो, असा जोरदार आवाज आला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून विविध विषयांसोबत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सिंचन आणि पर्यटन या विषयाला हात घातला. सिंचनाचे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात किती काम झाले हे कोण अधिक जाणतो, असे म्हणत पंतप्रधान म्हणाले, गोसीखुर्द प्रकल्प पुर्ण झाला आहे. भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत आहे. सरकार सिंचनातून समृध्दीसाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी पुन्हा टाळ्यांचा कडकडाट केला.तीन किलोमीटरपर्यंत नागरिकांच्या रांगासाकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी ३ वाजता सभा होती. सकाळी ११ वाजतापासूनच सभास्थळाकडे नागरिकांचे जत्थेच्या जत्थे जात होते. हातात झेंडे, डोक्यावर टोपी असे महिला-पुरुष शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानाकडे निघाले होते. तब्बल तीन किलोमिटरपर्यंत नागरिकांचा रांगा दिसत होत्या. महिला- पुरुषांसोबत लहान मुलांची संख्याही यात मोठी होती.साकोलीला छावणीचे रुपपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने साकोलीला छावणीचे रुप आले होते. ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. सभा स्थळावरही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सभास्थळी मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यात नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील विविध भागात पार्किंगची सोय करण्यात आली. सभास्थळी कुठलाही गोंधळ दिसत नव्हता. सभा संपल्यानंतर शिस्तबध्द पध्दतीने नागरिक बाहेर निघतांना दिसत होते.
Maharashtra Election 2019 ; नमामी वैनगंगे, नमामी चुलबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:00 AM
भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित होती. खचाखच भरलेल्या मैदानात मोदींना ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. बरोबर २.५५ मिनीटांनी नरेंद्र मोदींना घेवून येणारे हेलिकॉप्टर साकोलीच्या आकाशात दिसू लागले.
ठळक मुद्देपंतप्रधानांचा मराठीतून संवाद : जीवनदायी नद्यांचा उल्लेख करुन जिंकली उपस्थितांची मने