मोहन भोयर
तुमसर : मध्य प्रदेशातील जबलपूर, बालाघाट व गोंदिया दरम्यान ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर नागपूर इतवारी ते रिवा एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. सदर गाडी बंद करून गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस मध्य प्रदेशातील रिवापर्यंत पुढे विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या विचाराधीन आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा व रेल्वेची १२० कोटींची बचत होणार आहे.
कोल्हापूर-गोंदिया दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस मध्यप्रदेशातील जबलपूर व्हाया रिवापर्यंत पुढे नेण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने तयार केला आहे. यामुळे रेल्वेचे १०० कोटींचे दोन रेक (गाड्या) बचत होऊन २० कोटींचे एक इंजिन अन्यत्र वापरात येणार आहे. सदर प्रस्ताव पश्चिम मध्य रेल्वेने तयार केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूर ते पुणे अशी होती. त्यानंतर कोल्हापूर ते गोंदिया असा विस्तार झाला. नव्या प्रस्तावानुसार रिवापर्यंत गाडीने आल्यास तिच्या १८१७ किमीच्या प्रवास होणार आहे. मध्य प्रदेशात पाचशे किमी तर उर्वरित अंतर ही गाडी महाराष्ट्रात पार करणार आहे.
दरम्यान, पश्चिम मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि इतवारी ते रिवा एक्स्प्रेस (आठवड्यातून तीन) या दोन गाड्यांची सेवा एकत्रित करण्यात येणार आहे. यासाठी चार गाड्या रेप लागतात. या गाडीची प्राथमिक देखभाल दुरुस्ती कोल्हापूरला होते. रिवा ते इतवारी (३ दिवस) एक रेकने धावत आहे. रेल्वे बोर्डाने एक्स्प्रेस दोन रेट देण्याचे आणि ही गाडी दररोज सोडण्यास मंजुरी दिली आहे. नव्या प्रस्तावास रेल्वेचे अंदाजित वेळापत्रक तयार केले आहे. रिवा, जबलपूर येथील प्रवाशांना यामुळे थेट नागपूर, पुणे असा प्रवास करता येईल यामुळे १०० कोटींचे दोन रेकची बचत होईल याशिवाय २० कोटींचे एक इंजिन अन्यत्र वापरण्यात येईल.
महाराष्ट्र एक्स्प्रेसचे मध्य प्रदेशातील रिवापर्यंत पुढे विस्तारीकरण केले तरी या गाडीचे नाव महाराष्ट्र एक्स्प्रेसच असले पाहिजे. सदर नावात बदल केला तर खपवून घेतले जाणार नाही. त्याकरिता काँग्रेस जनांदोलन करेल. -प्रा. कमलाकर निखाडे, महासचिव, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, तुमसर