जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या थरार नाट्यात सरतेशेवटी आंध्र प्रदेशातील अण्णाचे साकाेली पाेलीस ठाण्यात बयान नाेंदविण्यात आले. येथूनच प्रकरणाला कलाटणी मिळाली. महिन्याभराचा कालावधी लाेटूनही तपास समाेर सरकला नाही. अण्णाकडून माेठी रक्कम उकळल्यानंतर तांदूळ तस्करांना पाठीशी घालणाऱ्या म्हाेरक्यांनी राईस मिलर्स यांनाही साेडले नाही. ३० लाख रुपयांची मांडवली झाली असताना, सर्वच आता मूग गिळून आहेत. टाॅप टू बाॅटम सेटिंग करण्यात ताे मास्टर माईंड काेण? याची चर्चाच रंगली आहे.
तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात अल्पदरात तांदळाची खरेदी करून हा तांदूळ महाराष्ट्रात आणला जाताे. दाेन्ही जिल्ह्यातील दलालांची यात सक्रिय भूमिका असते. लक्षावधी रुपयांची उलाढाल दिवसाकाठी हाेत असताना प्रकरणाची सारवासारव करण्यासाठी ३० लाख रुपये देण्यात आले. आता वाटमारीचे प्रकरण वेगळेच व यातून आपले चांगभले करणारे म्हाेरके वेगळेच, अशी चर्चा आहे.