इंद्रपाल कटकवार भंडाराप्रवासी हेच आमचे दैवत असे घोषवाक्य असणाऱ्या एस.टी. महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय केली जात आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या भंडारा बसस्थानकात खड्ड्यांची भरमार आहे. बसस्थानकात प्रवेश केल्यावर बस खड्यातून जात असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो. बसस्थानक परिसराच्या सभोवताल दुर्गंधीही पसरली असल्याने या समस्येपासून मुक्त करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापनासमोर आहे. शहरातील बसस्थानकावर २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा बसस्थानकात खड्डे आणि दुर्गंधीमुळे प्रवाशी व एस.टी. कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डेच खड्डे असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसतो. बसस्थानकाच्या इन आणि आऊट प्रवेशद्वारावरील मार्गावरील डांबर उखडलेले असल्याने गिट्टी सर्वत्र पसरली आहे. बसस्थानकात प्रवेश करताच मोठा खड्डा प्रवाशांचे स्वागत करतो. सहा महिन्यापूर्वी बसस्थानकातील खड्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पळसाला पाने तीनच या म्हणीप्रमाणे स्थिती पूर्ववत झाली. पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने डागडुजीच्या निर्माण कार्य व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींचे महसूल देणाऱ्या भंडारा आगाराच्या या मुख्य बसस्थानकातील समस्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुटीला प्रारंभ झाला असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. बसस्थानकात पिण्याचे पाणी व विजेची समस्या नाही. परंतु स्वच्छतेबाबत उदासिनता दिसून येते. फलाट व प्रवाशी बसत असलेल्या ठिकाणी स्वच्छता दिसून येते. परंतु बसस्थानकाच्या सभोवताल स्वच्छतेच्या मोहीमेला हरताळ फासलेला दिसतो. जुन्या बसस्थानक परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. बसस्थानकात पुरुष व महिला प्रसाधन गृह असले तरी पुरुष मंडळी जुन्या बसस्थानक परिसरात मुतारीसाठी जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण पसरलेले आहे. यासाठी सर्वस्वी आगार प्रशासन जबाबदार नसले तरी तेवढीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. नागरिकांनाच मुख्य बसस्थानक स्वच्छ ठेवायचे असेल त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. एस.टी. महामंडळालाही नागरिकांचे तद्वतच प्रवाशांचेही सहकार्य अपेक्षित आहे. बसस्थानकात प्रवेश केल्यानंतर चुकून पाय खड्यात पडला तर दवाखान्याचे दर्शन महामंडळाच्या कृपेने घ्यावे लागले तर यात नवल नको. वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी अशा हजारो नागरिकांची बसस्थानकावर रोजची ये जा असते. मागील एक महिन्यापासून अधूनमधून अवकाळी पावसानेही हजेरी लावली आहे. बसस्थानकात खड्डे पडल्याने त्यात पाणी साचत असते. पाणी साचल्यावर हे खड्डे किती खोल आहेत याचा अंदाज पादचारी प्रवाशांना तसेच बसचालकांना येत नाही. यामुळे खड्डयात पडणे किंवा बस अचानक खड्यातून गेल्याने बसचेही नुकसान होते. प्रवाशांच्या अंगावर घाण पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय घाणीमुळे दुर्गंधीचीही समस्या आहे. बसस्थानक व छत्रपती शिवाजी संकुल यामध्ये मोठा नाला आहे. या नाल्याचीही साफसफाई कित्येक महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधीचा विळखा कायम आहे. बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत स्थानिक आगारव्यवस्थापनाने विभागीय नियंत्रकांना कळविले आहे. बसस्थानकात असलेल्या खड्यांची दुरुस्तीबाबतही वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. वेळोवेळी थातूरमातूर डागडुजी करून वेळ काढली जाते. मात्र त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. डागडुजी करण्यात मलीदा लाटण्याचा प्रकार तर होत नसावा अशी शंकाही वारंवार व्यक्त करण्यात येते. बसस्थानकातील खड्डे हे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. महामंडळाच्या प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन खड्डे दुरुस्त करावे तसेच स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. अपंग, महिला, लहान मुले, युवती असे अनेक जण बसचा प्रवास करण्यासाठी बसस्थानकात येतात. त्यांना येथे असुविधांचा सामना करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाने याची दखल घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्यात अशी जनसामान्यांसह प्रवाशांची मागणी आहे.
मुख्य बसस्थानक खड्ड्यांच्या विळख्यात
By admin | Published: April 20, 2015 12:45 AM