आंतरराज्यीय मार्गावर जड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. मॅग्निजचे ट्रक, मध्यप्रदेशातील मालवाहतूक ट्रक तथा रेतीचे ट्रक याच मार्गाने धावतात. पुलावर पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्डे चुकविण्यासाठी कसरत करावी लागते. पवनारा-चिचोली दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना खड्डे चुकवून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्ते जलमय झाले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.
चिचोली, गोबरवाही, राजापूर, नाका डोंगरी व मध्यप्रदेशातील कटंगीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालविताना प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच आता पाऊस सुरू झाल्याने यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने हळूवार चालवावी लागत आहेत. त्यामुळे ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांची अवस्था खराब झाल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
कोट
रस्त्यावरील खड्डे मागील काही महिन्यांपूर्वी मुरूम घालून बुजविण्यात आले होते. सदर काम मंजूर आहे. परंतु वर्क ऑर्डर मिळण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
विनोद चुरे, उपकार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग