संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गावात खुलेआम दारू विकली जाते. याला पोलिसांचीही संमती आहे. गावात दररोज भांडण, तंटे होवून शांतता भंग पावत आहे. याच दारूमुळे गावातील सहा मुलींची सोडचिठ्ठी झाली, अशीही दारू बंद करण्यासाठी गत काही दिवसांपासून महिलांनी पुढाकार घेतला आहे. मात्र दारूबंदी होण्याचे नाव घेत नाही. दरम्यान शुक्रवारी महिलांनी दुर्गाअवतार धारण करीत गावात दारू बंदी करा अन्यथा घराघरात दारू विकण्याची परवानगी द्या, असा पवित्रा घेतला. कुंभली येथील महिलांचा हा आक्रमक पवित्रा पाहून गावकरीही अचंबित झाले.साकोलीपासून तीन कि़मी. अंतरावर कुंभली गाव आहे. या गावात सध्या दारूचा महापूर वाहत आहे. आठ ते दहा जण दारू विक्रीचा खुलेआम व्यवसाय करीत आहे. विशेष म्हणजे गावात कोणतेही परवाना प्राप्त दारू दुकान नाही तरीही गावात गावठी दारू मुबलक उपलब्ध होते. पोलिसही या व्यवसायीकांना पाठीशी घालतात. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे.कुंभली गावातून दारू कायमची हद्दपार करण्यासाठी तंटामुक्त समिती ग्रामपंचायतीने अनेकदा प्रयत्न केले. मात्र दारूबंदी झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच पुन्हा गावात दारूचा महापूर वाहू लागतो. या सर्व प्रकाराला पोलिसच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला जातो.आता गावातून दारू कायमची हद्दपार करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची सभा कुंभली येथील वटवृक्षाखाली घेण्यात आली. संपूर्ण गावकरी या सभेला उपस्थित होते. या सभेत सरपंच भेंडारकर, सावरबांधे, बडवाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश खोटेले, माजी सरपंच आत्माराम खोटेले, पंचायत समिती सदस्य लखन बर्वे, उपाध्यक्ष नागेश्वर भेंडारकर, अविनाश ब्राम्हणकर यांच्यासोबत पोलीस निरीक्षक रायपुरकरही उपस्थित होते.यावेळी गावकऱ्यांनी दारूमुळे कसे दुष्परिणाम होत आहे, याची माहिती दिली. दारूमुळे गावात दररोज भांडण, तंटे होत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे कायमची गावातून दारू हद्दपार करावी, पोलीस गावातून दारू हद्दपार करीत नसतील तर आम्हाला घराघरात दारू विक्रीची परवानगी द्या, अशी मागणी या सभेत महिलांनी केली. महिलांची ही मागणी ऐकून सर्वचजण अचंबित झाले. महिलांना किती त्रास होत असेल हेच त्यांच्या बोलण्यातून दिसत होते. आता दारूबंदीसाठी पोलीस कसा पुढाकार घेतात आणि गावातील दारू विक्रेत्यावर कोणती कारवाई करतात याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात खुलेआम दारूची विक्री केली जात आहे. देशी-विदेशी दारूसह गावठी दारूही गाळली जाते. पोलिसांना विशेषत: बिटजमादारांना हा प्रकार माहित असतो. परंतु हप्तेखोरीच्या नादात कारवाई केली जात नाही. आता कुंभलीसारख्या इतर गावातील महिलाही आक्रमण होण्याची शक्यता आहे.
गावात दारूबंदी करा, नाही तर घराघरात विक्रीची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 9:45 PM
गावात खुलेआम दारू विकली जाते. याला पोलिसांचीही संमती आहे. गावात दररोज भांडण, तंटे होवून शांतता भंग पावत आहे. याच दारूमुळे गावातील सहा मुलींची सोडचिठ्ठी झाली, अशीही दारू बंद करण्यासाठी गत काही दिवसांपासून महिलांनी पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देकुंभलीच्या महिलांचा दुर्गावतार : दारूबंदीसाठी आयोजित तंटामुक्त गाव समितीच्या सभेत प्रश्नांचा भडीमार