गोंदिया : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारी रेमडेसिविर या इंजेक्शनचा शासकीय रूग्णालयात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी आवश्यकतेनुसार उसनवारी तत्वावर रेमडेसिविर इंजेक्शन प्राधिकृत खाजगी कोविड रूग्णालयास व्यापक रूग्णहितार्थ अटी व शर्तीच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी शनिवारी (दि.१०) जारी केले आहेत.
गेल्या दिवसात कोविड आजारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली आहे. यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयांना देखील परवानगी दिली आहे. खाजगी रुग्णालयामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन वापर वाढलेला आहे. मात्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे खाजगी रूग्णालयामध्ये रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया व जिल्हा शल्य चिकित्सक, गोंदिया यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे. तसेच जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने ९ एप्रिलच्या सभेमध्ये, उद्भवलेली आपातकालीन स्थिती पाहता रूग्णहितार्थ शासकीय रूग्णालयातील उपलब्ध रेमडेसिविर इंजेक्शन खाजगी कोव्हीड रूग्णालयातील भरती रूग्णसंख्येचा विचार करून ८० टक्के किंवा ५० व्हायल (जे कमी असेल ते) एवढा पुरवठा करण्याची शिफारस केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारी रेमडेसिविर या इंजेक्शनचा शासकीय रूग्णालयात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी आवश्यकतेनुसार उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यात यावेत.
नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई
रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर सार्वजनिक आरोग्य विभाग व टास्क फोर्स निकषाप्रमाणे आहे किंवा कसे याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. या आदेशाचे पालन न करणारी तसेच उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
या केल्या सूचना
खाजगी रूग्णालयास वाटप करण्यापूर्वी शासकीय रूग्णालयाकरीता डीसीएचमध्ये पाच ते सहा दिवस पुरेल एवढा साठा आरक्षित ठेवण्यात यावा.
खाजगी कोविड रूग्णालयामध्ये भरती कोव्हीड रूग्ण संख्येच्या ८० टक्के किंवा ५० व्हायल (जे कमी असेल ते) एवढे रेमडेसिविर इंजेक्शन प्रत्यक्ष रूग्णालयातील भरती, रूग्णनिहाय आवश्यकतेनुसार पुरविण्यात यावेत.
खाजगी रूग्णालयांनी रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी करतांना त्यांना खाजगी औषध विक्रेत्यांकडुन होणाऱ्या पुरवठा विचारात घ्यावा. शासकीय साठयाची मागणी करण्याआधी खाजगी औषध विक्रेत्याकडून इंजेक्शन खरेदी करण्याचा पर्याय वापरावा.
रेमडेसिविर इंजेक्शन खाजगी रूग्णालय ७ दिवसाचे आत परत करतील या हमीवर निव्वळ उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यात यावे. इंजेक्शन परत करतांना शक्यतोवर त्याच बँडचे राहील याबाबत दक्षता घ्यावी.
सर्व शासकीय यंत्रणाकडे उपलब्ध असलेला साठा वरील प्रमाणे वितरित करण्यास अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.