पाण्याचा अपव्यय : ग्रामस्थ करताहेत तलावाची दुरूस्तीसंजय साठवणे साकोलीभंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. या जिल्ह्यात मामा तलावाची संख्या मोठी आहे. मात्र लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक तलावाची अवस्था खराब झाली आहे. मागच्याच महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मालुटोला येथील तलावाला भगदाड पडून तलावातील पाणी वाया गेले. या तलावाच्या पाळीला दुरूस्ती करण्याचे काम गावकऱ्यांनी केले जवळपास २० हजार रूपये खर्च केले. मात्र शासनातर्फे छदामही गावकऱ्यांना देण्यात आला नाही.तलावाची देखभाल दुरूस्तीचे काम लघु पाटबंधारे विभागाकडे आहे. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व शासनाचा अधुरा निधी यामुळे तलावाच्या दुरूस्ती व देखभालीकडे स्पष्ट दुर्लक्ष होत आहे. साकोली तालुक्यातील बहुतांश मोठमोठी तलाव आजही दुरूस्तीची वाट पाहत आहेत. मालुटोला येथे माजी मालगुजारी तलाव आहे. हा तलाव ६० एकर जागेत व्यापला असून या तलावाची सिंचन क्षमता १२०.९० हेक्टर आर एवढी आहे. परिसरात या तलावाव्यतीरिक्त सिंचनाची इतर कुठलीच सोय नाही. त्यामुळे हा तलाव पावसाळ्यात भरला की तेच पाणी सिंचनासाठी उपयोगात आणले जाते.मात्र या तलावाला बरीच वर्षे झाल्याने तलावाची पाळ ठिकठिकाणाहून ‘लिकेज’ होते. यापुर्वी सन २००६ ला याच तलावाचे ‘वेस्टवेअर’ फुटल्याने परिसरातील संपूर्ण पीक वाहुन गेले होते. त्याहीवेळी गावकऱ्यांनीच लोकवर्गणी करून तात्पुरती दुरूस्ती केली होती. तशीच परिस्थिती यावर्षीही झाली. आॅगस्ट महिन्यात आलेल्या अतिवृष्टीने या तलावाच्या पाळीला पुन्हा एक मोठे भगदाड पडल्याने पाणी वाहुन जात होते. त्यामुळे पुन्हा २००६ ची पुनरावृत्ती होणार की काय? अशी भिती गावकऱ्यांना वाटली. त्यांनी विलंब न लावता एकजुटीने या तलावाची पाळ दुरूस्त केली. यासाठी गावकऱ्यांना १५ ते २० हजार रूपये खर्च आला. मात्र शासनाने याची साधी विचारपुसही केली नाही.
लघुपाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मालुटोला तलावाची दुरवस्था
By admin | Published: September 10, 2015 12:23 AM