लाखनी (भंडारा) : नेहमीच्या भांडणाला कंटाळून मोठ्या भावाने चक्क लहान भावाच्या हत्येची सुपारी दिली. यात नागपुरातील सुपारी किलरने धारदार शस्त्राने लहान भावाची हत्या केली. हा थरार लाखनी तालुक्यातील सावरी मुरमाडी येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. आकाश रामचंद्र भोयर (३१,रा. सावरी मु.) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या १५ तासात सुपारी देणारा मोठा भाऊ राहुल रामचंद्र भोयर (३३, रा. सावरी) व सुपारी किलर मारुती न्यायमूर्ती (२८,रा. नागपूर) याला अटक केली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
मंगळवारी सकाळी सावरीजवळील खेडेपार रोडलगत ५० फूट अंतरावर एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती गावातीलच रहिवासी मंगेश टिचकुले यांनी रात्री ११:३० वाजता फोनवरून लाखनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच लाखनी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक देवीदास बागडे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक सुशांत सिंग, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार, सहायक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
आकाश भोयर याचा खून करून मृतदेह अंदाजे ५० फूट आत शेतात फेकून दिला. सावरी-खेडेपार रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. घटनास्थळी श्वान पथक व फॉरेन्सिक चमू यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय परीक्षणासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून प्रथम मोठा भाऊ राहुल भोयर याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यात त्याने धाकट्या भावाच्या हत्येची सुपारी न्यायमूर्ती याला दिल्याची कबुली दिली.
अशी घडली घटना
आकाश आणि राहुल भोयर यांच्यात लहानसहान वादातून भांडण होत असे. काही दिवस राहुल हा नागपूर येथे गेला होता. यावेळी तो मारोती न्यायमूर्ती याच्या संपर्कात आला. राहुल हा सात दिवसांपूर्वीच गावात परत आला होता. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास राहुल भोयर, आकाश भोयर व मारोती न्यायमूर्ती असे तिघे जण खेडेपार रस्त्यावरील सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय परिसरात गेले. येथे त्यांनी दारू ढोसल्याची माहिती आहे. याचवेळी आखलेल्या पूर्वनियोजित कटाच्या आधारे मारोती न्यायमूर्तीने आकाशवर धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केली. राहुलला मंगळवारी दुपारी १२:३० वाजता तर न्यायमूर्ती याला दुपारी ३:३० वाजता नागपूर येथून अटक करण्यात आली. अवघ्या १५ तासात हत्येचा छडा लावण्यात आला. दोघांवर लाखनी पोलिस ठाण्यात अपराध क्र. ३७५/२०२३ कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षण सत्यवीर बंडीवार करीत आहेत.
राहुल हा तंटामुक्तीचा अध्यक्ष
राहुल भोयर हा सावरी मुरमाडी येथील तंटामुक्त गाव समितीचा अध्यक्ष होता. ज्याच्या खांद्यावर गावातील तंटे सोडविण्याची जबाबदारी होती. त्यानेच लहान भावाच्या हत्येची सुपारी देत घटनेला अंजाम दिला. आपसी व कौटुंबिक वादात पदाची जराही तमा राहुलने बाळगली नाही, असेच म्हणावे लागेल. या घटनेने मात्र गावात एकच खळबळ उडाली आहे.