इंद्रपाल कटकवार
चुल्हाड (भंडारा) : बपेरावरून चुल्हाड गावाकडे परत येत असताना मोटारसायकलची उभ्या झाडाला जोरदार धडक बसल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी १ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील देवसर्रा गावाच्या हद्दीत घडली. रामप्रसाद श्रीराम अंबुले (४५) रा. चुल्हाड असे मृताचे नाव आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील बपेरा गावाकडे काही कामाचे निमित्त चुल्हाड येथील रामप्रसाद अंबुले हे गेले होते. कामे आटोपल्यावर गावाकडे परतण्यासाठी निघाले असता देवसर्रा राष्ट्रीय महामार्गाचे कडेला असणाऱ्या उभ्या झाडावर त्यांची दुचाकी एम एच ४० झेड ४४८५ ही आदळली. उभ्या झाडाला जोरदार धडक बसल्याने त्यांचा चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे कळताच गावकरी मदतीला धावून आले.याशिवाय घटना स्थळापासून गावांचे अंतर ८ किमी असल्याने गावातही अपघाताची माहिती जलद गतीने पोहचली. नातेवाईक व आप्तस्वकीय घटनास्थळी पोहचले. रामप्रसाद अंबुले यांच्या मागे पत्नी, मुली व एक मुलगा आहे. घटनेची माहिती सिहोरा पोलिसांना देण्यात आली.
जड वाहनांच्या संख्येत वाढ
राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहेत. परंतु वाहतूक राज्य मार्गावरून सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर कामे सुरू करण्यात आली नाहीत. दर आठवड्यात एक-दोन अपघात होत आहेत. अरुंद असणाऱ्या राज्य मार्गावर जड व वाहनांचे संख्येत वाढ झाली असल्याने अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. महामार्ग मृत्यू महामार्ग झाला असल्याचा सूर आहे. लहानमोठे अपघात रोज महामार्गावर होत आहेत. यात अनेकांनी हातपाय गमावले तर काहींनी जीवही गमावला आहे. महामार्गाचे कामे करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही.