पवनी (भंडारा) : अल्पवयीन मुलीला सायकलवर बसवून शेतात नेऊन अत्याचार करणाऱ्या तालुक्यातील रुयाळ येथील तरुणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे या प्रकरणात अवघ्या पाच महिन्यांतच निकाल देण्यात आला आहे.
गुरुदास तुकाराम खोब्रागडे (२१, रा. रुयाळ, ता. पवनी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो १९ ऑक्टोबर २०२१ रोजी एका अल्पवयीन मुलीला सायकलवर बसवून जात असल्याची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाली. नातेवाइकांसह शोध घेतला असता एका शेतात तुरीच्या ओळीत ते बसलेले आढळले. गुरुदासच्या ताब्यातून मुलीची सुटका करून पवनी ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी भादंवि ३७६ (ए )(बी)सह पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांनी केला. आरोपीला अटक केली. साक्षी - पुरावे गोळा करून दोषारोपपत्र तातडीने भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले.
जलद गतीने प्रकरणात साक्ष-पुराव्यांची तपासणी सरकारी अभियोक्ता ॲड. दुर्गा तलमले यांनी केली. साक्ष - पुराव्यांवरून आरोप सिद्ध झाल्याने प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी आरोपी गुरुदास खोब्रागडे याला सात वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नायक नितीनकुमार साठवणे यांनी काम पाहिले.