भंडारा : पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाला. त्यानंतर दुसरा विवाह केला. ती अर्ध्यातच साथ सोडून निघून गेली. तिसरे लग्न केले, तर पत्नी चांगली वागत नाही म्हणून तिचा गळा आवळून खून केला. यानंतर पतीनेही विषप्राशन करून आत्महत्या केली. साकोली तालुक्यातील पळसपानी येथील एका संसाराची अशी वाताहत झाली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.
चरणदास सुखराम राऊत (४०) याने पत्नी पपीता हिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चरणदासनेही विषप्राशन केले. त्याचाही मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. पपीता ही चरणदासची तिसरी पत्नी होती. मजुरीवर कुटुंबाची गुजराण करणाऱ्या चरणदासची तीन लग्ने झाली होती. पहिला विवाह २००३ साली झाला. परंतु, साडेतीन वर्षांतच बाळंतपणात पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर २००७ मध्ये चरणदासने दुसरा विवाह केला. आठ वर्षे ते एकत्र राहिले. परंतु, मूलबाळ होत नसल्याने २०१५ मध्ये दुसरी पत्नीही त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली. त्यामुळे चरणदास एकटाच राहत होता. आई-वडील, भाऊ असले तरी तो वेगळा राहायचा.
तीन वर्षे एकटाच राहून त्याने २०१८ मध्ये घानोड (आमगाव) येथील पपीतासोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगी झाली. तिचे नाव सृष्टी असून ती आता दोन वर्षांची आहे. गत रविवारी पपीताचा संशयास्पद मृतदेह स्वयंपाकखोलीत आढळून आला होता, तर चरणदासने बहिणीच्या गावी जाऊन विष घेतले होते. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याने पपीताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मंगळवारी खुनाचा गुन्हा चरणदासवर नोंदविण्यात आला. दरम्यान, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एका कुटुंबाची अशी वाताहत झाली.
सृष्टी झाली निराधार
तिसरी पत्नी पपीतापासून चरणदासला मुलगी झाली. तिचे नाव सृष्टी असून आता ती दोन वर्षांची आहे. मात्र, आईचा खून आणि वडिलाने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे दोन वर्षांची निरागस चिमुकली निराधार झाली आहे. पळसपानी येथे चरणदास आपल्या परिवारासह आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. आता सृष्टीला सांभाळण्याची जबाबदारी चरणदासच्या वृद्ध आई-वडिलांवर आली.