भंडारा : भाऊबिजेनिमित्त ओवाळणीसाठी माहेरी आलेल्या पत्नी व मुलांना घेण्यासाठी आलेल्या जावयाचा सासऱ्याच्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना लाखांदूर येथील प्लॉट परिसरात शुक्रवारी घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
जगदिश पुंडलिक काशीवार (वय ४०, रा. कोसमतोंडी, ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. लाखांदूर प्लॉट येथील रामकृष्ण विनायक गहाणे यांची मुलगी संगीता हिचा विवाह जगदीश काशीवार यांच्याशी झाला होता. त्यांना दोन अपत्ये आहेत. सात दिवसांपूर्वी जगदिशने पत्नी संगीता आणि दोन मुलांना भाऊबीज ओवाळणीसाठी लाखांदूर येथे आणून सोडले होते. त्यानंतर जगदिश गावी परत गेले.
दोन दिवसांपूर्वी बुधवारी जगदिश लाखांदूर येथे पत्नीला घेण्यासाठी आले होते. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारी कोसोमतोंडी येथे जाण्याचा बेत आखला होता. मात्र सकाळी १० वाजताच्यासुमारास जगदिशला अस्वस्थ वाटू लागले. ही माहिती त्यांनी घरातील सदस्यांना दिली. तत्काळ उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जगदिशचा मृत्यू झाला. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दु:खाचा डोंगर
जगदिश हा घरातील कर्ता पुरुष असल्याने संगीतावर मोठे संकट कोसळले. मुलांवरील पित्याचे छत्र हरपले. जगदिशच्या अचानक मृत्यूने लाखांदूर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगदिशवर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी कोसमतोंडी येथे करण्यात आले. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून, तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार गोपाल कोसरे करीत आहेत.