सकाळपासूनच पालांदूर येथे सुभाष मित्रमंडळाच्या मैदानात जलसा उत्सव समितीच्यावतीने कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता विशेष व्यवस्था करण्यात आलेली होती. भल्या पहाटेपासून गावातील प्रत्येक रस्त्याला पाण्याने स्वच्छ करण्यात आले. प्रत्येक कला मंडळाला एक विशिष्ट जागा देत कोरोनाच्या अनुषंगाने काळजी घेतली होती. झाडीपट्टीतील नामवंत कलाकारांनी आपली कला दाखवीत पालांदूर येथील जलशाला यात्रेचे स्वरूप दिले. लोककलेला मिळालेला मानाचा मुजरा लौकिकाचा ठरला.
लोककलेतील दंडार, गोंधळ, घोडा नृत्य, तसेच दांडपट्टा कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले. जय शक्ती दुर्गा दंडार मंडळ मऱ्हेगावचे लोकशाहीर प्रेमराज गोटेफोडे, ढिवरखेडा येथील लोकशाहीर अर्जुन चंदनबावणे, घोडा पार्टीचे नृत्य देवीदास पोवणकर, शंकर शेंडे, बळीराम चाचेरे रेंगेपार कोहळी, ओमकर्ण घोडा नृत्य नरेश दुनेदार विरली बु., गोंधळातील शाहीर परसराम मेश्राम सांनगाव. दांडपट्टा पवनी येथील सुमारे पंचवीस कलाकारांनी सादर केलेल्या नेत्रदीपक व रोमहर्षक शारीरिक प्रात्यक्षिकांना जनमानसाने कलेला प्रतिसाद दिला. कलाकारांच्या कलेला जनसामान्यांनी डोक्यावर घेतले. रोख बक्षिसांची उधळण करीत कलेला मानाचा सन्मान दिला. डीजेच्या तालावर तरुणाई झिंगाट झाली.
लोककलेचा संपूर्ण संच गावातून मुख्य मार्गावरून नाचत-गाजत जाऊन आपल्या कलांच्या आविष्काराचे जनसामान्यांना उत्कृष्ट प्रदर्शन करून दाखविले.
जलशाच्या निमित्ताने पालांदूर परिसरातील प्रत्येक गावात घरोघरी पाहुणे मंडळींनी हजेरी लावली. दिवाळीत पार पडलेली मंडई ही कोरोनाच्या सावटात सजली होती. मात्र आता कोरोनाचे भय कमी झाल्याने सर्वसामान्यांनी जलशाला हटकून हजेरी लावली.
रात्रीला सहा वाजेपासून संगीत कार्यक्रमाची सुंदर मेजवानी लावणीच्या रूपात प्रेक्षकांना मिळाली. रात्रीला संगीत नाटकात का, रक्त पिता गरिबांचे. या नाटकाचे सादरीकरण यशस्वीरीत्या पार पडले. दिवसभराच्या व रात्रीच्या कार्यक्रमांना गावकरी लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जलसा अर्थात मंडई उत्सवाच्या यशस्वितेने आयोजक जलसा मंडळ कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले. संजयनगर येथील तरुणांनी एकीचे बळ दाखवत जलसा उत्सव साजरा केला.