तुमसर : तुमसर तालुक्यात चिखला येथे ब्रिटिशकालीन भूमिगत मँगनीज खाण आहे; परंतु या गावात सोयी-सुविधांचा अभाव असून, खाण प्रशासनाने कामगारांच्या १०० सदनिकांचे बांधकाम चिखला येथे न करता इतर गावांत करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत खाण प्रशासनाविरोधात असंतोष आहे.
चिखला येथे भूमिगत मँगनीज खाण असून, या गावात अद्यापही सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. येथील कामगारांच्या सदनिका चिखला येथे बांधकाम न करता त्या इतर गावांत सुरू करण्याचा निर्णय खाण प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे चिखल्याच्या सरपंच नीतू मडावी, माजी सरपंच दिलीप सोनवणे, माजी जि.प. सदस्य संगीता सोनवणे, उपसरपंच इजराईल शेख तथा ग्रामस्थांनी यासंदर्भात खाण प्रशासनाला लेखी समस्यांचे निवेदन दिले.
चिखला येथे शंभर सदनिकांचे बांधकाम सुरक्षित स्थळी करण्यात यावे, जे कामगार आणि अनफिट झाले त्यांच्या वारसांना खाणीत नोकरी मिळावी, खाण प्रशासनाकडून आपल्या कामगारांकरिता २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते; परंतु या गावात राहणारे ग्रामस्थ आजारी पडले तर त्यांना नागपूर, भंडारा येथे जावे लागते. त्यांनाही रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खाण प्रशासनाने मान्यताप्राप्त संघटनांशी वेतन करारनामा केला होता; परंतु त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही, त्यामुळे सदर कामगारांत खाण प्रशासनाविरुद्ध असंतोष आहे. चिखला गावात जगप्रसिद्ध भूमिगत मँगनीज खाण असूनही नियमानुसार त्यांना स्थानिक नागरिकांना कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, हा नियमांचा भंग आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, राज्य शासन व केंद्र शासनाने तत्काळ कारवाई करून ग्रामस्थांना न्याय्य हक्क मिळवून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.