भंडारा : जिल्ह्यात १८ डिसेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराचा बरकस प्रयत्न सुरू आहे. यातच एका महिला उमेदवाराने चक्क स्टॅम्प पेपरवर नोटरी करत जाहीरनामा प्रसिद्ध केला असून जाहिरनामा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय.
पवनी तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यातील सोमनाळा गावातील सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या या महिला उमेदवाराने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा लिहून दिला आहे. एवढेच नव्हे तर नोटरीही केली आहे. निवडून आल्यावर मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडू नये यासाठी एका महिला उमेदवाराने हा जाहीरनामा केला आहे. शासकीय दस्तावेजावर अधिकृत करून दिलेल्या या जाहिरनामाची तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.
गावात स्थानिक पातळीवरील दिग्गज स्थानिक नेते असताना निवडणुकीत १२०० मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी आपला जाहीरनामा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. दोन पानी लिहिलेला हा जाहीरनामा आपण निवडून आल्यास आपल्याला बंधनकारक राहील असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पवनी तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरळच ४६ सरपंच थेट जनतेतून निवडायचे आहेत. यासाठी पवनी येथील तहसील प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणुकीसाठी पवनी तालुक्यात ४६ सरपंच पदांसाठी १७५ उमेदवार भाग्य आजमावीत आहेत. प्रत्येक गावात ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. डीजे सोबत बॅनर पोस्टरबाजी दिसत आहे. तसेच सोशल मीडियावरही जंगी प्रचार सुरू असून आपलाच गट किंवा आघाडी कशी चांगली हे सांगण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे.
पोलीस प्रशासन सतर्क
सर्वात कठीण निवडणूक ग्रामपंचायतची असते. त्यामुळे निवडणूक असलेल्या गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क आहे. निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क मतदारांना बजावता यावा म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. गाव नेते मतदाराला प्रलोभन दाखवून मतदान खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहे.