संतोष जाधवर
भंडारा : लोकसाहित्याचा व मौखिक परंपरेचा सशक्त वारसा जतन करणाऱ्या मंकाबाई यशवंत मुंडे यांनी निरक्षर असूनही केवळ छंदाच्या जोरावर हजारो ओव्या, गवळणी रचल्या आहेत. त्यांच्या ओव्या ऐकल्यावर मंकाबाई एकही वर्ग शाळा शिकल्या नाहीत किंवा मंकाबाई अशिक्षित आहेत, असे म्हणताना कुणाची जीभ धजावणार नाही. अगदी सोप्या, ओघवत्या भाषेत कुणावरही तत्काळ ओव्या गाणाऱ्या मंकाबाईंची प्रतिभा पाहून एखाद्या साहित्यिकालाही प्रश्न पडेल. अनेक मार्मिक उदाहरणांतून त्या अगदी सहजपणे उपदेश देतात.
बालपणापासून कृषी संस्कृतीत, आध्यात्मिक वातावरणात वाढलेल्या मंकाबाईचा जन्म बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जोला गावी वडील भानुदास व आई काळूबाईंच्या पोटी झाला. वडील विठ्ठलभक्त असल्याने बालपणीच मंकाबाईंना अभंग, ओव्यांचा छंद जडला. मंकाबाईंचा बालविवाह बीडमधील बालाघाट डोंगररांगेतील चिखलबीड गावच्या यशवंत मुंडेंशी १९५० च्या दशकात झाला. माहेरप्रमाणेच सासरची कुटुंबवत्सलता व धार्मिक वातावरणामुळे मंकाबाईंच्या ओव्या पुढे बहरत गेल्या. लग्नानंतर सासूसोबत पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओव्या गायच्या. यातूनच पुढे त्यांना विविध विषयांवर ग्रामीण भाषेत काव्य, ओव्या गायची सवय लागली.
“शीतल सावलीला पाखरं ग झाली गोळा,
देसाई, माझा बाबा, विसाव्याचा पानमळा..!
शीतल, गं, सावलीला पाखरं घेती झोप,
माय माझी गवळण, विसाव्याची नांदरुक”
अशा विविध प्रकारच्या ओव्या अगदी सहजपणे त्यांना सुचतात. त्यानंतर मुले मोठी होत गेली आणि पुढे मुलगा बाळासाहेब मुंडे यांची भंडारा जिल्ह्यात शिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या मुलासोबत भंडारात सहा वर्षांपासून राहत आहेत. मात्र, गावाकडच्या आठवणी त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. त्यामुळे त्या गावाकडील गोष्टी, सगेसोयरे यांचे प्रसंग ओव्यांतूनच सांगतात. परिसरातील नागरिक ओव्या ऐकून आश्चर्य व्यक्त करतात.
आजही एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श
मंकाबाईंचे सहा मुलांचे कुटुंब आजही एकत्रच आहे. त्यांना सहा मुले, सुना, १९ नातवंडे असून आजही ते सर्व एकत्रच राहतात. एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्शच त्यांनी समाजासमोर मांडला आहे. थोरला मुलगा जालिंदरसह लक्ष्मण, सहदेव हे तिघे शेती करतात. वसंत हा साखर कारखान्यात पर्यवेक्षकपदी कार्यरत आहे, तर आदिनाथ बीड येथे प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. लहान मुलगा बाळासाहेब मुंडे हे भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषद हायस्कूल वरठी येथे सहायक शिक्षकपदी कार्यरत आहेत.