धास्ती गुडमॉर्निंग पथकाची : जंगलव्याप्त लोहारावासीयांना दिला शौचालयाचा संदेशभंडारा : जंगलव्याप्त गाव असल्याने या गावाकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असते, असा समज असणाऱ्या ग्रामस्थांना तो चुकीचा असल्याचे आज कळून चुकले. जंगली श्वापदांचा धोका व किर्र अंधारात जीवाचा धोका पत्करुन ‘गुडमॉर्निंग’ पथकाने भल्या पहाटेच उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना वाटेतच अडविले. कारवाईच्या भीतीने पथकाला बघून अक्षरश: अनेकांनी हातातील पाणी भरलेला ‘लोटा’ फेकल्याचा प्रसंग बघायला मिळाला.तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त लोहारा गावात गुडमार्निंग पथकाच्या कारवाईने हा प्रकार घडला. तुमसर तालुक्याच्या गटविकास अधिकारी विजय झिंगरे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे गुडमॉर्निंग पथक व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक लोहारात दाखल झाले. जंगलव्याप्त असल्याने लोहारा येथे नेहमी श्वापदांचा धोका असतो. अशा लोहारा येथे हे पथक स्वत:च्या जीवन मरणाचा विचार न करता केवळ गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व त्यांना शौचालयाचे महत्व कळावे यासाठी हे पथक गावात दाखल झाले. आठवडाभरापासून गुडमार्निंग पथकाने तुमसर तालुक्यात शौचास जाणाऱ्यांवर बंदी आणली आहे. याची फलश्रृतीही या पथकाला मिळत असून गावकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनानंतर अनेकांनी शौचालय बांधण्याला पुढाकारही घेतला आहे. ओडीएफ अंतर्गत हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सरसावली आहे. याअनुषंगाने तुमसर तालुक्यातील हे पथक भल्या पहाटेच गावात दाखल होत आहे. मागील पाच दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवाईचा धसका अनेकांनी घेतलेला आहे. हे पथक कोणत्या दिवशी कोणत्या गावात पोहचेल याची पुसटशीही कल्पना कुणालाही नाही. त्यामुळे कोणत्या ग्रामस्थांना कारवाईला सामोरे जावे लागेल. हा प्रसंग पथक डोळासमोर दिसताच उघड्यांवर जाणाऱ्यांवर ओढवतो. लोहारा येथे आज हे पथक दाखल झाले. मात्र याची कल्पना ग्रामस्थांना नव्हती. सूर्योदय होवू लागताच ग्रामस्थही उघड्यावर शौचासाठी घरातून लोटे हातात घेवून निघाले. मात्र पथकाने धोप रोड, सोनपुरी रोड, गायमुख, सोरणा या मार्गावर गस्त ठेवली होती. आज दिवसभर या पथकाची चर्चा गावात चर्चील्या गेली. यानंतर पथक लंजेरा, सोरना येथे दाखल होऊन त्यांनी ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व सांगितले. या पथकात जिल्हा कक्षाचे राजेश येरणे, पल्लवी तिडके, हर्षाली ढोके, शशिकांत घोडीचोर, पौर्णिमा डुंभरे, वर्षा दहिकर, भरत जिभकाटे, मंगेश शेरके, सरपंच ठाकरे, उपसरपंच गुलाब पिल्लारे, शैलेश माकडे, विशाल हुमणे, आंधळगाव पोलीस ठाण्याचे राजेश दिक्षीत, तिलकचंद चौधरी, देवागंणा सार्वे, टिंकू क्षीरसागर, महेश शेंडे यांच्यासह ग्रामस्थांचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)शौचास जाणार नसल्याची कबुली पथकात पोलीस कर्मचारी होते. त्यांना बघताच कारवाई होईल या भीतीने अनेकांनी हातातील पाणी भरलेले लोटे अक्षरश: फेकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्यांची वाट अडविली. त्यांना उघड्यावर शौचास न जाण्याचे मार्गदर्शन केले. यानंतर अनेकांनी घरी शौचालय असतांनाही उघड्यावर जात असल्याचे कबूल केले. पथकाच्या धास्तीने अनेकांनी यानंतर उघड्यावर शौचास जाणार नसल्याची कबुली पथकाला दिली.
पथकाला बघताच अनेकांनी फेकले ‘लोटे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 12:24 AM